एकीकडे देशभरात तीव्र उन्हाळ्यामुळे उष्णतेचे चटके बसत असतानाच आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईची झळ सर्वसामान्यांना बसली आहे. सकाळी व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. तर आता सर्वसामान्य मजूर आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरातील ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीत तब्बल २६१ रुपयांनी वाढ केली आहे.
कामगार, मजूर, प्रवासी आणि घरापासून दूर राहणारे विद्यार्थी यांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने त्याच्या झळा गोरगरीब वर्गाला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. ५ किलोच्या सिलेंडरच्या दरात २६१ रुपयांची वाढ झाल्याने या सिलेंडरची किंमत आता ५४९ रुपयांवरून वाढून थेट ८१० रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातही या सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेली या सिलेंडरची किंमत ही ५१ रुपयांनी वाढ केली होती. मात्र आताची वाढ ही आधीच्या तुलनेत खूप अधिक असल्याने त्याचा फटका गोरगरीब मजूर वर्गाला मोठ्या प्रमाणात बसणार असून, काटकसर करून गुजराण करणाऱ्या या वर्गाला आता जीवनावश्यक वस्तूंवर अधिक खर्च करावा लागणार आहे.
याआधी आज सकाळी इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे गॅस पुरवढ्यावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत थेट ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र सध्यातरी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
