Vodafone Idea News: भारताच्या टेलिकॉम सेक्टरमधील एजीआरचा मुद्दा कंपन्यांसाठी दीर्घकाळापासून मोठं ओझं बनला आहे. विशेषतः व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या दबावामुळे सर्वाधिक प्रभावित झाली होती. प्रचंड कर्ज आणि कमकुवत बॅलन्स शीटमुळे कंपनीसमोर कामकाज सुरू ठेवण्याचं आव्हान होतं. अशा परिस्थितीत, दूरसंचार विभागाचा (DoT) नवीन निर्णय कंपनीसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे. दूरसंचार विभागानं व्होडाफोन आयडियाची एकूण एजीआर थकबाकी कमी करुन ६४,०४६ कोटी रुपये केली आहे.
आधी हा आकडा ८७,६९५ कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीला २३,६४९ कोटी रुपयांचा थेट दिलासा मिळाला आहे. ही कपात कंपनीच्या एकूण कर्जाचा बोजा कमी करते. कंपनीनं आतापर्यंत एजीआर थकबाकीपोटी ७,८५४ कोटी रुपये भरले आहेत. त्यानंतरही सुमारे ५६,१९२ कोटी रुपयांचे पेमेंट अद्याप बाकी आहे. ही रक्कम आगामी काळात ठराविक वेळापत्रकानुसार भरावी लागेल. मात्र, नवीन गणनेनंतर एकूण बोजा पूर्वीपेक्षा बराच कमी झाला आहे.
दिलासा मिळण्यामागचं कारण काय?
हा दिलासा प्रामुख्याने गणनेतील चुका सुधारल्यामुळे मिळाला आहे. व्होडाफोन आयडिया दीर्घकाळापासून काही बाबींची दोनदा गणना केली गेली असल्याचं सांगत होती. तसंच आधी केलेल्या पेमेंटचं योग्य समायोजनही झालं नव्हतं. आता या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच चक्रवाढ व्याज आणि दंडाच्या गणनेतही सुधारणा करण्यात आली आहे.
कंपनीवर काय परिणाम होईल?
या निर्णयामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आता व्होडाफोन आयडियासाठी नवीन निधी उभारणं सोपं होऊ शकतं. बँक आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही वाढू शकतो. यामुळे कंपनीला आपलं कामकाज स्थिर करण्यास मदत होईल. दिलासा मिळाल्यानंतर कंपनी आपल्याकडे उपलब्ध असलेली रोख रक्कम नेटवर्क सुधारणा आणि 5G रोलआउटसाठी वापरू शकते. आतापर्यंत प्रचंड कर्जामुळे गुंतवणूक मर्यादित होती. आता जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत स्पर्धेत टिकून राहण्याची संधी मिळेल.
सरकार आणि क्षेत्रासाठी का महत्त्वाचे?
केंद्र सरकार व्होडाफोन आयडियामध्ये मोठे भागधारक आहे, त्यामुळे कंपनीचं टिकून राहणं धोरणात्मकदृष्ट्या आवश्यक आहे. हे पाऊल संपूर्ण टेलिकॉम क्षेत्रासाठीही महत्त्वाचं आहे. यामुळे भारतात तीन खाजगी कंपन्यांची रचना टिकून राहील, ज्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा राहील आणि ग्राहकांना उत्तम सेवा मिळत राहतील.
सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण
कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामध्ये एजीआर थकबाकीवर लागणारं भारी व्याज आणि दंड अधिक कमी करण्याची मागणी करण्यात आलीये. जर इथंही दिलासा मिळाला, तर कंपनीची स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. या कपातीमुळे कंपनीला इंडस टॉवर्स सारख्या विक्रेत्यांची थकबाकी भरण्यासही मदत होईल, ज्यामुळे सप्लाय चेन सुधारेल आणि नेटवर्क विस्तार वेगानं होईल.
