Pimpri-Chinchwad : ऐन उन्हाच्या भरात पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याचा ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:40 IST2026-04-30T13:40:07+5:302026-04-30T13:40:31+5:30
- अपुरा, कमी दाबाने आणि गढूळ पाणीपुरवठा : निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा फटका; अवघ्या शहराचे बिघडले वेळापत्रक; नागरिकांचा संताप उफाळला

Pimpri-Chinchwad : ऐन उन्हाच्या भरात पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याचा ताप
पिंपरी : निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने बुधवारी सकाळी आणि सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ऐन उन्हाळ्यात पिंपरी, कासारवाडी, चिखली, चिंचवड, सांगवी, वाकड परिसरात अपुऱ्या, कमी दाबाने आणि गढूळ पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागले.
पिंपरी-चिंचवड शहराला रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते. हे पाणी से. क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केले जाते. तेथून विविध भागास पाणी पुरविले जाते. पाणीपुरवठा विभागाने स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. दुरुस्तीचे काम बुधवारी पहाटे सहापर्यंत सुरू होते. परिणामी, रावेत बंधारा येथून जलउपसा झाला नसल्याने सेक्टर २३ येथील पाण्याच्या टाक्या भरल्या नाहीत. त्यामुळे बुधवारी पुरवठ्यावर परिणाम झाला. याविषयीचे निवेदन जाहीर केले होते. मात्र, संदेश न पोहोचल्याने पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागली.
थेरगाव वाकडमध्ये दुसऱ्या दिवशीही खंडित
मंगळवारी सकाळी नऊनंतर पाणी खंडित झाले. ते दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सुरळीत झाले नव्हते. थेरगाव परिसरातील डांगे चौक, गुजरनगर, संतोषनगर, मातोश्री कॉलनी, सोळा नंबर, मंगलनगर परिसरात पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशीही खंडित होता.
सांगवीसह कासारवाडीत पाण्याचा थेंबही नाही
नियोजित शटडाऊनचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठा व्यवस्थापनातील ‘टेल भाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगवी परिसराला बसला. बुधवारी सकाळी पाणी येईल या आशेवर असलेल्या नागरिकांची यामुळे पुरती निराशा झाली. सांगवीसह कासारवाडी भागात टाक्या भरल्या नाहीत.
टंचाईमुळे टँकरच्या मागणीतही मोठी वाढ
पाण्याच्या टंचाईमुळे टँकरच्या मागणीतही मोठी वाढ झाली. खासगी टँकरसाठी सोसायट्यांनी हिंजवडी, माण परिसरातून अधिकचे पैसे देऊन टँकर मागवले होते.
पिंपरीत गढूळ, नेहरूनगरात कमी दाबाने पाणी
पिंपरी गावठाण परिसरामध्ये गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. संत तुकारामनगर परिसरामध्ये तीन दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. नेहरूनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी पाणी आले नव्हते. बुधवारी सकाळी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा झाला.
चिंचवडला महिलांची नाराजी
चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, आहेरनगर, एसकेएफ कॉलनी, गुरुद्वारा या भागामध्ये सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे या भागातील महिलांनी नाराजी व्यक्त केली.
आमच्या भागामध्ये पहाटे चारला पाणी येते. मात्र, आज पाणी येणार नाही, याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. अनेकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागले, अशी तक्रार संत तुकारामनगर परिसरातील श्रीकांत कोळी यांनी केली.
पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे टाक्या भरल्या नाहीत. काही भागात नागरिकांच्या तक्रारी होत्या. काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता