नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:14 IST2026-05-01T06:11:58+5:302026-05-01T06:14:29+5:30
काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा,‘प्रहार’चे बच्चू कडू शिंदेसेनेचे आमदार; नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी

नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
मुंबई - उमेदवार देण्याची आधी केलेली घोषणा मागे घेत काँग्रेसने उद्धव सेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना दिलेला पाठिंबा, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदेसेनेत विलीन करत मिळविलेली उमेदवारी, राष्ट्रवादीने (अजित पवार गट) चर्चेतील नावांना खो देत झिशान सिद्दिकी यांच्या नावाला दिलेली पसंती, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा मिळालेली संधी अशा घटनाक्रमानंतर विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे.
भाजपचे सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, डॉ. प्रज्ञा सातव, शिंदेसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) झिशान सिद्दिकी हे महायुतीचे नऊ जण तर महाविकास आघाडी समर्थित उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकूण आले १७ अर्ज
या निवडणुकीत पक्षांच्या ९ पैकी चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय चार उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. अर्जांची छाननी २ मे रोजी होईल. अपक्षांच्या अर्जावर अनुमोदक, सूचक यांच्या सह्या नसल्याने हे अर्ज बाद होतील. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ मे आहे. या मुदतीनंतर निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात येईल.
भाजपच्या सहाही उमेदवारांनी विधानभवनात उमेदवारी अर्ज भरले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे आणि कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, झिशान सिद्दिकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या तर अंबादास दानवे यांनी अनिल परब आदी उपस्थित होते. उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत विलीन केला आणि आमदारकी मिळविली. शिंदेसेनेने गुरुवारी दुपारपर्यंत सस्पेन्स कायम ठेवत डॉ. नीलम गोऱ्हे आणि कडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. २०२४ मध्ये हत्या झालेले माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेतृत्वाने स्पर्धेतील इतरांना धक्का दिला. पुन्हा आमदारकी न मिळू शकलेले अमोल मिटकरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.