Pimpari-chinchwad : ...तर महापालिका सभागृह चालू देणार नाही; स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणेंनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:31 IST2026-04-19T18:29:42+5:302026-04-19T18:31:22+5:30
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणेंचा इशारा : उपसूचना प्रकरणात चौकशी समितीने अहवाल सादरची मागणी

Pimpari-chinchwad : ...तर महापालिका सभागृह चालू देणार नाही; स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणेंनी दिला इशारा
पिंपरी : मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी बोगस उपसूचनेद्वारे ५२ कोटी रुपयांच्या केलेल्या घोटाळ्याप्रकणी नेमलेल्या चौकशी समितीची मुदत संपली आहे. मात्र, चौकशी समितीने अहवाल सादर केला नाही. सोमवारी (दि. २०) सर्वसाधारण सभा आहे. त्यापूर्वी या चौकशी समितीचा अहवाल सादर झाला नाही, तर महापालिकेचे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी दिला आहे.
प्रवीण जैन यांनी ७० हून अधिक कामांची बिले परस्पर अदा केली आहेत.
ही बाब महापालिका अधिनियम १९४९ मधील अंदाजपत्रकीय नियंत्रण, वित्तीय शिस्त व अधिकृत मंजुरीसंदर्भातील तरतुदीच्या उल्लंघनास कारणीभूत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी चौकशी समिती नेमली आहे. समितीला चौकशी अहवाल सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरदेखील समितीने अहवाल सादर केला नाही. दरम्यान, या प्रकरणाने महापालिकेची राज्यभरात बदनामी झाली आहे. असे असताना सोमवारी होणाऱ्या सभेत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्यातच हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपमध्येच दोन गट पडले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर वरिष्ठांनी कानउघाडणी केल्यानंतर महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती. प्रशासनाने मुदतीत अहवाल सादर करणे आवश्यक होते. आयुक्तांसोबत बोलणे झाले आहे. सोमवारपूर्वी ते अहवाल प्रसिद्ध करणार आहेत. तसे झाले नाही, तर सोमवारी महापालिकेचे सभागृह चालू देणार नाही, असे बारणे यांनी सांगितले.