Pimpari-chinchwad: राष्ट्रवादीच्या आणखी दोन नगरसेवकांच्या सह्या;भाजपची खेळी की दबाव कमी करण्याचा प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:54 IST2026-04-17T09:53:23+5:302026-04-17T09:54:23+5:30
- भाजपकडून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची टप्प्याटप्प्याने आखलेली राजकीय खेळी, यावर चर्चा रंगली आहे.

Pimpari-chinchwad: राष्ट्रवादीच्या आणखी दोन नगरसेवकांच्या सह्या;भाजपची खेळी की दबाव कमी करण्याचा प्रयत्न?
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ५२ कोटींच्या बोगस उपसूचना प्रकरणात राष्ट्रवादीच्या आणखी दोन नगरसेवकांच्या सह्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंकज भालेकर आणि यश साने यांच्या सह्यांचा उल्लेख पुढे येताच, हा प्रकार नेमका सत्य उघड करण्यासाठी आहे की भाजपकडून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची टप्प्याटप्प्याने आखलेली राजकीय खेळी, यावर चर्चा रंगली आहे.
या घोटाळ्यात सुरुवातीपासूनच भाजपच्या नगरसेवकांच्या सह्या, ठेकेदार आणि वित्त विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे आरोप होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर अचानक विरोधी पक्षातील नगरसेवकांची नावे पुढे येऊ लागल्याने प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी सगळेच सामील असा वातावरणनिर्मितीचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजपकडून ‘सगळेच सामील’चा प्रयत्न
बोगस उपसूचना नेमक्या किती, कोणत्या विभागातील आणि कोणाच्या नावाने तयार करण्यात आल्या? याबाबत भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांकडून आणि मुख्य लेखा व वित्त विभागाकडून परस्परविरोधी माहिती समोर येत असल्याने शहरवासीयांची दिशाभूल होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. राजकीय वर्तुळात याकडे भाजपच्या अंतर्गत धुसफुशीचा परिणाम म्हणूनही पाहिले जात आहे. काही दिवसांपासून या प्रकरणात भाजपमधीलच दोन गटांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे पुढे आणून मूळ जबाबदारीवरील फोकस हटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा फटका आता सभागृहाबाहेर राजकीय प्रतिमेलाही बसू लागला आहे.
नावे टप्प्याटप्प्याने बाहेर; मूळ प्रश्न मात्र अनुत्तरित
या प्रकरणात रोज नवी नावे समोर येत असली, तरी मूळ बोगस उपसूचना कोणी तयार केल्या, कोणाच्या दबावाखाली सह्या घेतल्या आणि अंतिम लाभ कोणाला होणार होता, हा मुख्य प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. त्यामुळे भाजपची खेळी की अंतर्गत धुसफूस, हा सवाल आता अधिक धारदार झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर यश साने यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.