पिंपरी : निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या परिसरामध्ये बिबट्या असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वनविभागाची तारांबळ उडाली. मंगळवारी रात्री सुरू झालेली शोधमोहीम बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होती. अन्न आणि पाण्याच्या शोधात या परिसरामध्ये बिबट्याचे वर्षभरापासून वास्तव्य आढळल्याचे वन्यजीवप्रेमींचे मत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सीमेवर दुर्गादेवी टेकडी आहे. देहूरोड दारूगोळा कारखान्यापासून दुर्गादेवी टेकडीपर्यंत सुमारे ४०० हेक्टर जागेवर मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. घनदाट वनराई आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकजण सकाळी व सायंकाळी दुर्गादेवी टेकडीवर येत असतात.
मंगळवारी सकाळी ‘दुर्गादेवी टेकडीवर बिबट्याचे दर्शन’ असे वृत्त सोशल मीडियावर पसरल्याने भीतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे आणि महापालिका आपत्कालीन विभागाचे पथक मंगळवारी सायंकाळी दुर्गादेवी टेकडीच्या परिसरात दाखल झाले. ज्या नागरिकांना बिबट्या दिसला, त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. दुर्गादेवी टेकडीच्या मागील बाजूच्या परिसरामध्ये जाऊन शोधमोहीम राबवण्यात आली.
वन्यजीवप्रेमींचा दुजोरा
दुर्गादेवी टेकडी परिसरामध्ये वर्षभरापासून बिबट्याचे वास्तव्य आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ तो परिसरात येत आहे. एका बाजूला दारूगोळा कारखान्याचा भाग आणि आणि दुसऱ्या बाजूला एमआयडीसीचा पाणीपुरवठा विभाग, दुर्गादेवी तलाव आहे, त्यामुळे बिबट्याचे दर्शन होत आहे, असे असे वन्यजीवप्रेमी श्रीहरी तापकीर यांनी सांगितले.
सोशल मीडियावर निगडी परिसरात बिबट्या असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर वनविभाग आणि महापालिकेच्या वतीने शोधमोहीम राबवली आहे. मात्र, बिबट्या सापडला नाही. - ओमप्रकाश बहिवाल, आपत्कालीन विभागप्रमुख .
घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ज्यांना बिबट्या दिसला, त्यांच्याशी संवाद साधला. नागरिकांच्या मते या परिसरामध्ये दोन ते तीन वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. मात्र, त्याने कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. - एफ. जी. हाके, वन्यजीव संरक्षक .
दुर्गादेवी टेकडी, दारूगोळा कारखाना परिसरामध्ये जंगल आहे. पूरक वातावरण असल्याने बिबट्याचे वास्तव्य आहे. त्याचा कोणालाही त्रास नाही. या ठिकाणी शोधमोहीम राबविली. तेथील कर्मचाऱ्यांमध्ये जागृती केली. काही माहिती मिळल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ यावर संपर्क साधावा. - मनोज बरबोले, विभागीय वन अधिकारी.
Web Summary : A leopard sighting near Nigdi's Durgadevi Hill prompted a forest department search. The leopard has reportedly resided there for a year, seeking food and water. Residents are urged to be cautious.
Web Summary : निगडी की दुर्गादेवी पहाड़ी के पास तेंदुए देखे जाने से वन विभाग ने खोज शुरू कर दी है। बताया जा रहा है कि तेंदुआ एक साल से भोजन और पानी की तलाश में वहां रह रहा है। निवासियों से सतर्क रहने का आग्रह किया गया है।