खराडीतील लिफ्टच्या बोगस परवाना प्रकरणात विद्युत निरीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:03 IST2026-05-13T14:03:09+5:302026-05-13T14:03:34+5:30

- आयटी पार्कमधील १८ पैकी आठ लिफ्ट न बसवताच प्रमाणपत्र : एकाच दिवसात ८२ लिफ्टची तपासणी केल्याचा धक्कादायक दावा

pimpari-chinchwad electrical inspector suspended in Kharadi lift fake license case | खराडीतील लिफ्टच्या बोगस परवाना प्रकरणात विद्युत निरीक्षक निलंबित

खराडीतील लिफ्टच्या बोगस परवाना प्रकरणात विद्युत निरीक्षक निलंबित

पिंपरी : पुण्यातील खराडी भागातील आयटी पार्क प्रकल्पासह इतर लिफ्टच्या तपासणीत आणि परवान्यांतील गंभीर विसंगतीप्रकरणी मुंबईस्थित विद्युत निरीक्षक उदय डांबे यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी एकाच दिवसात ८२ लिफ्टची तपासणी केल्याचा धक्कादायक दावा केला होता, तर खराडीत १८ पैकी आठ लिफ्ट न बसवताच परवाना दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवला होता.

राज्य सरकारने ८ मे रोजी निलंबित केलेले उदय डांबे मार्च २०२१ ते जुलै २०२५ दरम्यान मुंबईत विद्युत निरीक्षक (लिफ्ट) म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे राज्यातील अनेक विभागांतील लिफ्टना परवानगी, नियमित तपासणीची जबाबदारी होती. पुण्यातील खराडी भागातील मोठ्या आयटी पार्क प्रकल्पासह इतर लिफ्टच्या तपासणीत आणि परवान्यांमध्ये गंभीर विसंगती आढळल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली.

त्यात परवाना प्रणालीतील गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत. डांबे यांनी १३ मार्च २०२४ ते ३० जुलै २०२४ या कालावधीत पुण्यातील खराडी येथील बिझिनेस टॉवरमधील १८ लिफ्टची प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण न करता, विहित नमुन्यातील सर्व बाबींची पूर्तता न तपासता खोटे प्रमाणपत्र, परवाने आणि चालविण्याची अनुमती दिली होती. त्यातील आठ लिफ्ट तर बसवल्याही नव्हत्या. ज्या यंत्रणेवर हजारो नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्या यंत्रणेने प्रत्यक्ष तपासणी न करताच परवानग्या दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

लिफ्टच्या तपासणीतील बोगसगिरीबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवला होता. विधानसभेत आमदार हेमंत ओगले यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने हे प्रकरण साधी प्रशासकीय चूक म्हणून न पाहता गंभीर शिस्तभंग मानला आहे.

मानवी क्षमतेच्या पलीकडील तपासण्या

डांगे यांच्या कार्यालयाने अवघ्या काही दिवसांत १८५ पेक्षा अधिक लिफ्टची तपासणी केल्याचे दाखवले आहे. एका दिवसात २६, ३५, ५०, ६०, ६७ लिफ्ट तपासल्याच्या नोंदी आढळतात. एकाच दिवसात ८२ लिफ्टची तपासणी केल्याचा धक्कादायक दावाही डांबे यांनी केला होता. प्रत्यक्षात प्रत्येक लिफ्टची यांत्रिक, विद्युत, सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणा तपासण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेतला तर हा आकडा केवळ अविश्वसनीयच नव्हे, तर चौकशी समितीच्या भाषेत ‘मानवी क्षमतेच्या पलीकडील’ असल्याचे दिसून आले.
 

तब्बल १,५८६ लिफ्टची स्वतः तपासणी केल्याची नोंद

डांबे यांच्या अधिकार क्षेत्रात १९ मार्च ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान एकूण ३,३७० लिफ्ट परवाने देण्यात आले. यापैकी डांबे यांनी १,५८६ लिफ्टची स्वतः तपासणी केल्याची नोंद आहे. हे प्रमाण एकूण संख्येच्या सुमारे ४७ टक्के आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हाताखाली १० सहायक विद्युत निरीक्षक कार्यरत असूनही त्यांनी ही तपासणी स्वत: केल्याचे दाखवले. या तपासण्या प्रत्यक्षात झाल्या होत्या की नाही याबद्दल चौकशी समितीने गंभीर शंका उपस्थित केली आहे.

Web Title : खराड़ी लिफ्ट लाइसेंस घोटाले में विद्युत निरीक्षक निलंबित

Web Summary : मुंबई स्थित विद्युत निरीक्षक उदय डांबे को खराड़ी में लिफ्ट निरीक्षण में अनियमितताओं के लिए निलंबित कर दिया गया। उन पर बिना जांच के लाइसेंस स्वीकृत करने और एक दिन में असंभव संख्या में लिफ्टों का निरीक्षण करने का आरोप है। लोकमत ने इस धोखाधड़ी को उजागर किया था।

Web Title : Electrical Inspector Suspended in Kharadi Lift License Scam Case

Web Summary : Uday Dambe, a Mumbai-based electrical inspector, was suspended for irregularities in lift inspections in Kharadi. He allegedly approved licenses without proper checks, even for uninstalled lifts, and claimed to inspect an impossible number of lifts daily. Lokmat consistently highlighted this fraudulent activity.