पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या ‘पीएफ’मध्ये ठेकेदाराने घोळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) नियमित कपात केला जात असतानाही ती रक्कम डिव्हाइन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीने संबंधित खात्यात जमा केलेली नाही. याबाबत विचारणा करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोग्य विभागातील विविध कामांसाठी ठेकेदारांकडून कंत्राटी कामगार नेमण्यात येतात. मात्र, वारंवार पगार वेळेत न होणे, कपातींचा तपशील न मिळणे आणि आता पीएफमधील अनियमितता समोर आली आहे.
महापालिकेचा अंकुश नाही का?
कामगारांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे महाव्यवस्थापक डी. के. शुक्ला यांची कार्यपद्धती दबावाची असून, पीएफसारख्या हक्काच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जात असल्याचे सांगितले जाते. तक्रारीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे तत्कालीन उपायुक्त सचिन पवार यांनी शुक्ला यांच्या जागी दुसरी व्यक्ती देण्याची मागणी कंपनीकडे केली होती. कामगारांशी समन्वय राखणारा प्रतिनिधी बदलण्याबाबत कंपनीला नोटीसही देण्यात आली होती. मात्र, कंपनीने या नोटिशीलाच केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे.
पगारात दिसते, मात्र खात्यात येत नाही
विशेष म्हणजे, नोटिशीनंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. पीएफ कपातीची रक्कम अनेक महिन्यांपासून खात्यात जमा नसल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. पगार स्लिपमध्ये कपात दिसत असली तरी ईपीएफ खात्यात त्याची नोंद नसल्याने संताप वाढत आहे.
कर्मचाऱ्याचा थेट आरोप
मी डिव्हाइन कंपनीत २०२३ पासून काम करत आहे. मात्र, त्यांनी माझा पीएफ तीन महिने उशिरा जमा करण्यास सुरुवात केली. त्यात माझा पीएफ कमी जमा करण्यात आला आहे. बोनस व पीएफ मिळून कंपनीने माझ्यासह इतर कामगारांच्या खात्यात प्रत्येकी २ लाख ७१ हजार २५० रुपयांची तफावत ठेवली आहे. याबाबत वारंवार विचारणा करूनही कंपनी देण्यास तयार नाही. - दिलीप पाडाळे, कर्मचारी
संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार माझ्यापर्यंत आली नाही. त्याबाबत माहिती घेतो. कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि बोनस वेळेत जमा करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. - प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका
कंपनी सर्व कामगारांचे वेळेत पगार करते. पीएफ आणि इतर बाबींची माहिती घेतो. कोणत्याही कर्मचाऱ्याला धमकावण्यात आलेले नाही. - डी. के. शुक्ला, महाव्यवस्थापक, डिव्हाइन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस
Web Summary : A Pimpri-Chinchwad contractor allegedly embezzled health workers' PF. Despite deductions, funds weren't deposited. Workers face threats for questioning irregularities. An inquiry is underway.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में एक ठेकेदार पर स्वास्थ्य कर्मचारियों के भविष्य निधि को हड़पने का आरोप है। कटौती के बावजूद, धन जमा नहीं किया गया। अनियमितताओं पर सवाल उठाने पर कर्मचारियों को धमकियां मिल रही हैं। जांच जारी है।