ऐन उन्हाळ्यात पिंपरी चिंचवडच्या 'या' भागात तब्बल १७ तास बत्ती गुल; उकाड्याने नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:27 IST2026-04-20T13:25:31+5:302026-04-20T13:27:07+5:30
देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वीज बंद ठेवण्यात आली होती. मात्र, रात्री ८:४० नंतर तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला

ऐन उन्हाळ्यात पिंपरी चिंचवडच्या 'या' भागात तब्बल १७ तास बत्ती गुल; उकाड्याने नागरिक हैराण
पिंपरी : वाल्हेकरवाडी परिसरात शनिवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्रीही अंधार कायम राहिल्यामुळे नागरिकांचे प्रचंड त्रास झाले. वाल्हेकरवाडी, चिंतामणी चौक आणि आसपासच्या भागात तब्बल १७ तासांहून अधिक काळ वीज गायब होती. प्रचंड उकाड्यात नागरिकांना रात्रभर डासांचा त्रास सहन करावा लागला, तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष गैरसोय झाली.
महावितरणकडून २२ केव्ही देहूरोड वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वीज बंद ठेवण्यात आली होती. मात्र, रात्री ८:४० नंतर तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. तो रविवारी सकाळी ७ वाजताच सुरळीत झाला. त्यामुळे घरगुती कामे, पाणीपुरवठा आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले.
शहरातील रेल विहार, गुरुद्वारा चौक, आकुर्डी स्टेशन परिसर, जिजामाता चौक, तुकाराम नगर, शिवाजी पार्क, नंदनवन कॉलनी, वाल्हेकरवाडी गावठाण इतर भागात दिवसभर वीज पुरवठा देखभाल-दुरुस्तीसाठी बंद होता. मात्र त्यानंतरही वाल्हेकरवाडी येथील तीन ठिकाणी रात्रभर वीज पुरवठा बंद होता. वीज नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवला.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचा गोंधळ
शनिवारी अचानक वीज खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण झाले. भर उन्हात एसी, पंखे बंद पडल्याने घामाघूम झालेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मोबाइल आणि लॅपटॉप डिस्चार्ज झाल्याने अनेकांचा संपर्क तुटला, आणि घरून काम करणाऱ्यांचे काम ठप्प झाले.
थेरगावमध्ये १४ तास अंधार
वाकड, थेरगाव परिसरातही वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. थेरगावमध्ये शुक्रवारी तब्बल १४ तास वीज नसल्याने नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. पीक अवर्समध्ये भारनियमन होत असल्याचेही समोर आले आहे.
विजेची वाढती मागणी आणि देखभाल कामांमुळे वीज पुरवठा खंडित होता. वाल्हेकरवाडी परिसरात तीन ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने रात्री वीज पुरवठा बंद होता. - विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.
वाल्हेकरवाडी परिसरात दिवसा ७ तास आणि रात्री १० तासांहून अधिक असा १७ तास वीज पुरवठा बंद होता. रात्री वीज बंद असल्याने उकाडा आणि डासांचा त्रास प्रचंड वाढला होता. लहान मुले आणि वृद्धांसह नागरिकांना याचा त्रास झाला. - सानविका शिंदे, वाल्हेकरवाडी.