श्रीकृष्ण जन्माष्टमी : जन्माष्टमीला भेट देण्यासाठी मथुरा आणि वृंदावनमधील खास ठिकाणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:16 AM2018-08-28T11:16:30+5:302018-08-28T11:31:45+5:30

भारतातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे जन्माष्टमी. हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ३ सप्टेंबरला जन्माष्टमी असली तरी त्याचं त्याची तयारी बघितली जाऊ शकते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता. या उत्सवाची खरी मजा मथुरा-वृंदावन येथे बघायला मिळेल. जर तुम्हाला हा डोळे दिपवणारा सोहळा पहायचा असेल तर तुम्हीही तिथे जाऊ शकता. त्यासोबतच आम्ही तुम्हाला मथुरेतील काही मंदिरांबाबत सांगणार आहोत जिथे हा सोहळा जल्लोषात साजरा होतो.

भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. मथुरेत याच जागेवर एक भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिराला श्रीकृष्णजन्मभूमि मंदिर म्हटले जाते. हे मंदिर मथुरेच्या मधोमध आहे. असे मानले जाते की, पहिलं मंदिर इ. स. पूर्व ८०-५७ मध्ये तयार करण्यात आलं. तर दुसरं मंदिर विक्रमादित्याच्या काळात तयार करण्यात आलं. सध्या महामना पंडित मदनमोहन मालवीय यांच्या प्रेरणेतून हे मंदिर भव्य करण्यात आलंय.

मथुरेतील व्दारकाधीश मंदिर सुद्धा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. हे मंदिर आपल्या भव्य आरतीसाठी ओळखले जाते. या मंदिराच्या मुख्य आश्रमात राणी राधिकाच्या प्रतिमा आहे. या मंदिरातील होळी सणही चांगलाच लोकप्रिय आहे. असकुंडा घाटाजवळ या मंदिरातील प्रसाद तयार केला जातो. हे मंदिर आपल्या नक्क्षीकामासाठी प्रसिद्ध आहे.

वृंदावनमध्ये एक मंदिर आहे जे भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर रुपाला दर्शवतं. हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर आहे बांके बिहारी मंदिर. असे मानले जाते की, या मंदिरात आल्याशिवाय तुमची वृंदावन यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. इथे भगवान श्रीकृष्णाचे वेगवेगळे श्रृंगार सर्वांनाच आकर्षित करतात. या मंदिरात जन्माष्टमीच्या एका आठवडाआधी गर्दी बघायला मिळते.

जन्माष्टमीच्या निमित्ताने मथुरेला गेलात तर राधा रमण मंदिराचे दर्शन नक्की करा. या भव्य आणि प्राचीन मंदिराची सुंदरता तुम्हाला वेगळाच अनुभव देईल. या मंदिराचं निर्माण १५४२ मध्ये केलं गेलं होतं. या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी शालिग्रान यांचे रुप स्थापित आहेत. या मंदिरात जन्माष्टमीला मोठी गर्दी असते.

गोवर्धन पर्वताची कथा सर्वांनाच माहीत आहे. याच्या आजूबाजूच्या क्षेत्राला ब्रज भूमी म्हटले जाते. आज दूरदुरून हा पर्वत पाहण्यासाठी भाविक येतात. अनेक भाविक २१ किमी अंतराच्या या पर्वताची परीक्रमाही करतात.