Yamazaki 55: एका दारूच्या बाटलीची किंमत तब्बल ६५ कोटी; तरीदेखील खरेदीसाठी लांबच लांब रांगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 08:13 PM2022-10-08T20:13:23+5:302022-10-08T20:21:06+5:30

जपानमध्ये तयार झालेली यामाझाकी ५५ ही आतापर्यंतची सर्वात जुनी आणि महागडी व्हिस्की आहे. या दारूची किंमत कोटीमध्ये असूनही लोक तिची चव चाखायला ही किंमत मोजण्यासाठी तयार आहेत.

यामाझाकी ५५ ही जगातील सर्वात महागडी व्हिस्की सध्या चर्चेचा विषय बनली आहे. खरं तर या वर्षी या व्हिस्कीचे ७५० मिलीलीटर लिलावामध्ये ८,००,००० डॉलर म्हणजेच सुमारे ६५.२ कोटी रूपयांमध्ये विकले गेले. लक्षणीय बाब म्हणजे या ड्रिंकच्या एका शॉटची किंमत ४.७ कोटी रूपयांच्या घरात आहे.

१९६० नंतर प्रथमच डिस्टिल्ड, यामाझाकी ५५ ही हाउस ऑफ सनटोरीच्या इतिहासातील सर्वात जुनी सोलो माल्ट व्हिस्की आहे. या व्हिस्कीला सनटोरीचे संस्थापक शिंजिरो तोरी यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहे. त्यावर ५५ वर्षांहून अधिक काळ प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिस्कीबद्दल प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे समोर आले आहे की, या व्हिस्कीचा टेक्सचरही खूप अनोख्या पद्धतीचा आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "खूप जुनी स्कॉच व्हिस्की यामाझाकी ५५ जुन्या बौद्ध पुतळ्यासारखी आहे. शांत आणि रहस्यमय! तिचे स्वरूप एखाद्या मंदिरासारखे आहे. जपानी अगरबत्ती आणि जुन्या लाकडाच्या वासामुळे याच्या आतील भाग खूपच आकर्षित करणारा आहे."

जपानमध्ये असलेली ही जुनी व्हिस्की आता खूपच मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे. २०२० मध्ये जपानमध्ये लॉटरी सिस्टमद्वारे १०० बाटल्या रिलीज केल्यानंतर सनटोरीने २०२१ मध्ये याचा आणखी विस्तार केला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला Yamazaki 55 ची बाटली इस्तंबूल विमानतळावरील ड्युटी फ्री स्टोअरमध्ये विकली गेली, जी अंदाजे जवळपास ४.१४ कोटी रूपयांच्या बरोबर आहे.