32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:09 PM2024-05-18T17:09:51+5:302024-05-18T17:42:23+5:30

Swati Maliwal Net Worth : दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांचे पद आणि संपत्तीबाबतही चर्चा आहेत.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या आरोपांमुळे दिल्लीचे राजकारण तापले आहे. स्वाती मालीवाल यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर मारहाण आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. मात्र, पक्षाने त्यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

स्वाती मालिवाल यांच्या आरोपांमुळे दिल्लीपासून ते देशाच्या राजकारणात चर्चा सुरु आहेत. तसेच, दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांचे पद आणि संपत्तीबाबतही चर्चा आहेत.

स्वाती मालीवाल यांनी यावर्षी जानेवारीत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी शेअर आणि बाँड मार्केटमध्येही गुंतवणूक केल्याचे नमूद केले आहे.

एडीआरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी जानेवारीमध्ये स्वाती मालीवाल यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 19,22,519 रुपये असल्याचे घोषित केले. यापैकी फक्त 20,000 रुपये रोख, 32,000 रुपये बँक ठेवी आहेत तर 8,90,811 रुपये शेअर्समध्ये गुंतवले आहेत.

याशिवाय, स्वाती मालीवाल यांनी पोस्ट ऑफिस बचत योजनेत 3 लाख रुपये गुंतवले आहेत, तर त्यांनी एलआयसीमध्ये 17,138 रुपये गुंतवले आहेत. याचबरोबर, स्वाती मालीवाल यांच्याकडे 6,62,450 रुपयांचे दागिने आहेत.

स्वाती मालीवालच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एशियन पेंट्स, फाइन ऑरगॅनिक्स, पिडीलाइट, टीसीएस, टायटन आणि इतर अनेक शेअर्सचा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांचे जवळपास 9 लाख रुपयांचे एक्सपोजर आहे.

या सर्व गुंतवणुकीची किंमत 19,22,519 रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये स्वाती मालीवाल यांनी प्राप्तिकर रिटर्नमध्ये 24,12,470 रुपयांचे उत्पन्न घोषित केले आहे. विशेष म्हणजे स्वाती मालीवाल यांच्याकडे कोणतीच कार नाही किंवा कोणतेही कर्ज नाही.