"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 06:20 PM2024-05-18T18:20:36+5:302024-05-18T18:27:26+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

CM Mohan Yadav slams Uddhav Thackeray for using terrorist connections for Mumbai Lok Sabha Elections 2024 | "मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

BJP vs Uddhav Thackeray, Mohan Yadav: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नकली शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोहन यादव यांनी आज दक्षिण मुंबईत महायुतीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केली.

"बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली देत नकली शिवसेना हिंदूत्वविरोधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली आहे अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत ते म्हणाले की नकली शिवसेनेचे इतके अध:पतन झाले आहे की व्होटबँकेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या रांगेत ते जाऊन बसले आहेत. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मुसाला उबाठा सेनेच्या प्रचारात उतरवून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचे समर्थन नकली शिवसेना करत आहे. हा मुंबईकरांचा घोर अपमान आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नकली शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील," असे म्हणत मोहन यादव यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

"सत्ता असताना 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. गरीबी हटाव चे आश्वासन अनेक वर्षे सत्ता भोगूनही पूर्ण न करणाऱ्या काँग्रेसला आजही पुन्हा तेच आश्वासन द्यावे लागत आहे. मात्र देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही. भाजपा-एनडीए ने 400 जागांवर विजय मिळवला तर देशाचे संविधान धोक्यात येईल असा आरोप करताना काँग्रेसला त्यांनीच तब्बल 100 वेळा संविधान बदल केल्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. 1950 मध्ये संविधान लागू झाल्यापासून पं. नेहरूंच्या राजवटीत 11 वेळा, इंदिरा गांधींनी 17 वेळा  तर राजीव गांधींच्या राजवटीतच 10 वेळा संविधानात बदल केले गेले होते. बहुमताच्या बळावर मागच्या 10 वर्षांत भाजपा-एनडीए सरकारने  वेगाने देशाचा विकास आणि देशहिताचे  अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अपप्रचार करत फिरत आहेत," असा घणाघाती आरोप मोहन यादवांनी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीवर केला.

"एकीकडे सागरी सेतू, मेट्रो, पूल, रस्ते बांधणारे, कलम 370 हटवून जम्मू काश्मीरच्या जनतेला न्याय देणारे, ट्रिपल तलाक प्रथा बंद करून मुस्लीम महिलांचा सन्मान राखणारे, जातपात न पाहता सर्वांसाठी गरीब कल्याणाच्या योजना राबवणारे भाजपा-एनडीए, महायुती सरकार आहे. तर दुसरीकडे सदैव विकासकामात खोडा घालणारे, मुंबईची मेट्रो रोखणारे आणि संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपप्रचार करणारे मविआ आणि युपीए सरकार आहे. विरोधक समजतात तशी जनता दुधखुळी नाही. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजपा-एनडीए आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: CM Mohan Yadav slams Uddhav Thackeray for using terrorist connections for Mumbai Lok Sabha Elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.