देश-विदेशात भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 09:15 AM2022-10-27T09:15:02+5:302022-10-27T09:36:47+5:30

उज्जैन ते काशी आणि अयोध्या ते अबुधाबी अशा प्रकारे देशविदेशात त्यांनी भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा नवीन मंदिरे बांधली.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळात अयोध्या मंदिरासह इतर प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्वाराकडे लक्ष दिले आहे. उज्जैन ते काशी आणि अयोध्या ते अबुधाबी अशा प्रकारे देशविदेशात त्यांनी भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा नवीन मंदिरे बांधली. नुकतेच त्यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात महाकाल लोकचे उद्घाटन केले. तर अबुधाबीतही पहिले भव्य हिंदू मंदिर उभे राहिले आहे. पाहूया कुठे कोणत्या मंदिराचे काम सुरु आहे....

लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० मध्ये राममंदिराच्या प्रश्नावरुन रथयात्रा काढली, तेव्हा नरेंद्र मोदींनीही त्यात सहभाग घेतला होता. ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या मंदिराचा शीलान्यास केला. मंदिराचे काम जवळपास अर्धे पूर्ण झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे १८४२ हिंदू मंदिरे आहेत. त्यापैकी केवळ २१२ सुस्थितीत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रसिद्ध शीतलनाथ मंदिर तब्बल ३१ वर्षांनी २०२१ मध्ये खुले झाले. या मंदिरांचा होणार जीर्णोद्धार मार्तंड मंदिर (अनंतनाग), रघुनाथ मंदिर (श्रीनगर), शंकरगौरीश्वर मंदिर (पाटन), पांटेशन मंदिर (श्रीनगर), अवतीस्वामी आणि अवतीस्वरा मंदिर (अवंतीपोरा).

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर हे पंतप्रधान मोदी यांचे सर्वात आवडते धार्मिकस्थळ आहे. पंतप्रधान झाल्यावर मोदी यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत इशानेश्वर मंदिर, आस्था चौकात ओकारची मूर्ती, आदी गुरु शंकराचार्य यांची समाधी, शिव उद्यान आणि वासुकी तलावाची निर्मिती यांचा समावेश होता.

गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर इतिसाहात वारंवार परकीय आक्रमणे झाली. मोहमद गझनी ते औरंगजेबापर्यंत अनेकाने हे मंदिर अनेकदा तोडले, असा दावा केला जातो. ऑगस्ट २०२१ मध्ये मोदी यांनी पार्वतीमाता मंदिराचे भूमिपूजन, दर्शनबारी आणि प्रदर्शन केंद्राचे लोकार्पण या तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले.

मोघल शहेनशहा औरंगजेब याने १६६९ मध्ये काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते. १७८० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मार्च २०१९ पंतप्रधान मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत ७०० कोटींच्या काशी विश्वनाथ कॉरडॉरच्या कामाला सुरुवात झाली.

१२३४ मध्ये दिल्लीचा शासक अल्तमश याने महाकाल मंदिरावर हल्ला करून ते नष्ट केले होते. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक महाराजा राणोजी शिंदे यांनी या मंदिराचा १७३४ मध्ये जीर्णोद्धार केला होता. ११ ऑक्टोबर २०२२ : ८६५ कोटींच्या कामांचे लोकार्पण.

केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. ऋषीकेश ते कर्णप्रयागपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे काम सुरु असून २०२५ पर्यंत रेल्वेमार्ग सुरू होईल.

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी बहरीन येथील २०० वर्षे जुन्या मंदिराच्या कामासाठी लाखो डॉलरचा प्रकल्प सुरु केला. बहरीनध्ये मनामा येथे तीन मजली श्रीनाथजी मंदिर उभारण्यात येत आहे. २०१८ मध्ये मोदी यांनी अबूधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. यूएई सरकारने मंदिरासाठी जमीन दिली.