RBI gold reserve: भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:59 PM2023-02-17T15:59:37+5:302023-02-17T16:02:28+5:30

RBI gold reserve: सोन्याचा साठा असलेल्या टॉप-10 देशांमध्ये भारताचा कितवा नंबर ? वाचा...

RBI gold reserve: वाईट काळात सोनं हा उत्तम साथीदार असतो आणि सर्वसामान्यांबरोबरच रिझर्व्ह बँकेलाही हे चांगलंच माहित आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने सोनं खरेदी करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने अवघ्या दोन वर्षांत सुमारे 100 टन सोनं खरेदी केल्याची माहिती आहे. सध्या भारताचा एकूण सोन्याचा साठा इतका झाला आहे की, जगातील टॉप-10 देशांच्या यादीत भारत 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आरबीआयने हे सर्व सोनं कुठे ठेवलंय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल.

2022 मध्ये रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, भारतात सुमारे 754 टन सोन्याचा साठा आहे. यातील बहुतांश खरेदी गेल्या 5 वर्षांत झाली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान रिझर्व्ह बँकेने 132.34 टन सोनं खरेदी केलंय. अशाप्रकारे, 2022 मध्ये RBI ही जगातील सर्वात मोठी सोनं खरेदी करणारी केंद्रीय बँक बनली. यापूर्वी 2020 मध्ये केवळ 41.68 टन सोनं खरेदी करण्यात आलं होतं.

रिझर्व्ह बँक आपल्याकडील बहुतेक सोनं परदेशात ठेवलेलं आहे. आरबीआयने स्वतः सांगितलं की, भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 296.48 टन सोनं देशातच सुरक्षित आहे, तर 447.30 टन सोनं परदेशी बँकांकडे सुरक्षित आहे. यातील बहुतांश सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे ठेवलं आहे, तर काही टन स्वित्झर्लंडमधील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) कडे सुरक्षित आहे.

जगातील सोन्याच्या एकूण साठ्याबद्दल बोलायचे झाले तर अमेरिकेत सर्वाधिक सोनं आहे. जगातील देशांकडे असलेल्या एकूण सोन्यापैकी 75 टक्के सोनं अमेरिकेने स्वतःकडेच सुरक्षित ठेवलं आहे. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे 8,133 टन सोनं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीकडे 3,359 टन सोनं आहे. चीन 1,948 टन सोन्यासह 6 व्या स्थानावर आहे. सोन्याचा मोठा साठा असलेल्या टॉप-10 देशांमध्ये फक्त तीन आशियाई देशांचा समावेश आहे.

RBI परदेशात सोने का ठेवते? रिझर्व्ह बँकेने परदेशात सोनं ठेवण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करुन ते देशात आणणे सोपे नाही. त्याची वाहतूक आणि सुरक्षेवर मोठा खर्च होतो. याशिवाय कोणत्याही आर्थिक संकटात हे सोनं गहाण ठेवण्याची गरज भासल्यास ते पुन्हा परदेशात पाठवताना मोठा खर्च आणि सुरक्षेची कसरत करावी लागेल. 1990-91 मध्ये भारताला बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस दरम्यान बँक ऑफ इंग्लंड आणि युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे 67 टन सोने गहाण ठेवावे लागले होते.