Raja Raja Chola: शेकडो मंदिरे बांधणारे चोल राजे हिंदू नव्हते? कमल हसन यांच्या दाव्यात किती तथ्य..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:25 PM2022-10-06T15:25:34+5:302022-10-06T23:02:44+5:30

Raja Raja Chola: पोन्नियिन सेल्वन चित्रपटात दाखण्यात आलेले चोल साम्राज्याचे राजे हिंदू नव्हते, असा दावा कमल हसन आणि वेट्रीमारन यांनी केला आहे.

Raja Raja Chola: नुकताच प्रदर्शित झालेल्या 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात चोल साम्राज्याचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात चोल साम्राज्यातील महान शासक राज राजा चोल यांच्याबद्दलचा उल्लेखही आहे. आता त्याच राज राजा चोल यांच्या धर्मावरुन नवा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ दिग्दर्शक वेत्रीमारन राज राजा चोल हिंदू नव्हते, असा दावाकेला आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनीही वेत्रीमारन यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे.

या दाव्यानंतर आता लोकांनी गुगलवर राजा राजा चोल यांचा धर्म शोधायला सुरुवात केली. राज राजा चोलांबाबतचा वाद 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरू झाला. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट चोल साम्राज्याच्या इतिहासावर आहे. या चित्रपटात चोल वंशाचा राजा पोन्नियिन सेल्वन याचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. चित्रपटात राज राजा चोल यांचाही उल्लेख आहे.

चोल साम्राज्याची स्थापना कोठे व केव्हा झाली? चोल साम्राज्याचा इतिहास 1000 वर्षांहून अधिक जुना आहे. भारताच्या सुदूर दक्षिणेला कावेरी नदीच्या काठावर या साम्राज्याची सुरुवात झाली. तिरुचिरापल्ली ही या राज्याची राजधानी होती. दक्षिण भारतात भव्य-दिव्य मंदिरे बांधण्याचे श्रेय चोल राजांना जाते. कमल हसन आणि वेत्रीमारन, त्यांना हिंदू का मानत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी चोल राजवंशाची स्थापना केव्हा, कुठे आणि कोणी केली हे जाणून घेऊया?

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये नोंदवलेल्या इतिहासानुसार, कावेरी डेल्टामध्ये 'मुतियार' म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका लहान कुटुंबाचे राज्य होते. हे घराणे कांचीपुरमच्या पल्लव राजांच्या अधिपत्याखाली होते. इसवी सन 849 मध्ये चोल वंशाचा सरदार विजयालयाने या मुतियारांचा पराभव करून हा डेल्टा काबीज केला आणि चोल वंशाची स्थापना केली. विजयालयाने तंजावर शहर वसवले आणि निशुंभसुदिनी देवीचे मंदिर बांधले. नंतर त्याने आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या. दक्षिण आणि उत्तरेकडील पांड्य आणि पल्लव या राज्याचा भाग बनले.

इ.स. 985 मध्ये राजाराजा चोल पहिला या राज्याचा शासक बनला आणि त्याने चोल वंशाची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढवली. तंजापूर आणि गंगाईकोंडाचोलापुरममध्ये राज राजा आणि त्याचा मुलगा राजेंद्र प्रथम यांनी बांधलेली विशाल मंदिरे स्थापत्य आणि शिल्पकलेच्या दृष्टीकोनातून अद्भुत म्हटली जातात. तामिळ संस्कृतीत राज राजा खूप महान मानला जातो. राज राजा चोलचे साम्राज्य 985-1014 पर्यंत टिकले. दक्षिणेकडील आधुनिक श्रीलंकेपासून ते उत्तरेकडील मालदीवपर्यंत या राज्याचे राज्य होते विस्तारले.

चोल साम्राज्याच्या आश्रयाखाली बनवलेल्या कांस्य मूर्ती जगातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये गणल्या जातात. या काळात मंदिरे केवळ श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र नव्हते तर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र होते. या राजघराण्याने आधुनिक तामिळनाडूची जीवनरेखा बदलून टाकली. बृहदेश्वर मंदिर, राजराजेश्वर मंदिर देखील चोल राजांनी बांधले होते. या मंदिरांनी द्रविड स्थापत्यकलेला उंचीवर नेले. चोल वंशाच्या राजांनी दक्षिण भारतावर सुमारे 500 वर्षे राज्य केले.

कमल हसन राजराजला हिंदू का मानत नाहीत? मंदिरे, मूर्तींची अविश्वसनीय कलाकारी असूनही, कमल हसन राज राजा चोल यांना हिंदू राजा मानत नाहीत. यावर युक्तिवाद करताना ते म्हणाले, "राज राजा चोल यांच्या कारकिर्दीत 'हिंदू धर्म' असे काही नव्हते. त्यावेळी वैष्णव आणि शैव होते, ब्रिटीशांनीच 'हिंदू' हा शब्द तयार केला. वैष्णव आणि शैव यांना सामूहिकरित्या काय म्हणावे, हे इंग्रजांना माहित नव्हते. आठव्या शतकात अनेक धर्म आणि लोकांच्या विविध गोष्टींवर श्रद्धा होत्या.

कमल हसन यांनी अलीकडेच चित्रपटाच्या कास्ट आणि क्रूसोबत पोन्नियिन सेल्वन पाहिला. इतिहासावर आधारित कथा साजरी करण्याचा हा क्षण असल्याचे ते म्हणाले. इतिहासाची अतिशयोक्ती करू नये, भाषेचा मुद्दा त्यात समाविष्ट करू नये, असेही ते म्हणाले. दरम्यान, दिग्दर्शक वेत्रीमारन म्हणाले होते की, आमची प्रतिके काढून घेतली जात आहेत. तिरुवल्लुवरचे भगवेकरण करणे किंवा राज राजा चोलाला हिंदू राजा म्हणणे हे याचे उदाहरण आहे. सिनेमा हा सर्वसामान्यांसाठी असतो, त्यामुळे यामागचे राजकारण समजून घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.