महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:43 PM2024-05-01T16:43:57+5:302024-05-01T16:47:12+5:30

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती.

Eknath ShindeShiv Sena got 15 seats and Ajit Pawars NCP got four seats in the seat sharing of mahayuti for Lok Sabha elections | महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण

महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण

अक्षय शितोळे

Maharashtra Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अनेक आठवडे उलटल्यानंतरही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतीलही जागावाटपांचं समीकरण निश्चित झालं नव्हतं. मात्र आता मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी हे जागावाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून महायुतीकडूनही पालघरची जागा वगळता अन्य सर्व ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपसोबत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन नवे पक्ष महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती. शिंदेंच्या शिवसेनेला दोन अंकी जागा मिळवण्यात अपयश येईल, असा अंदाजही सुरुवातीच्या काळात वर्तवला जात होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात तब्बल १५ जागा आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश आल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या पदरी काहीशी निराशा आल्याचं स्पष्ट झालं आहे.

"मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ज्या चार जागांवर विजय मिळवला होता, त्या बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार जागा तर आपल्याला मिळतीलच. पण त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिथे खासदार आहेत त्यातल्याही काही जागा आपल्याला मिळतील," असा दावा अजित पवारांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी केला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर अजित पवारांना साताऱ्याची जागा भाजपला सोडावी लागली. तसंच परभणीची जागा रासपच्या महादेव जानकर यांना द्यावी लागली. सोबतच अजित पवारांच्या पक्षाकडून माढा आणि नाशिकच्या जागेवरही दावा सांगितला गेला होता. मात्र या दोन जागाही त्यांना मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे महायुतीच्या तहात अजित पवार फसले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवारांची काय आहे भूमिका?

महायुतीच्या जागावाटपाच्या तहात हरल्याचे आरोप फेटाळून लावत अजित पवार यांनी नुकतीच 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा एनडीएने जिंकल्या होत्या. उरलेल्या सात जागांपैकी चार जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. आम्ही मागच्या वेळी जिंकलेली साताऱ्याची जागा आम्हाला यावेळी सोडावी लागली. कारण छत्रपतींच्या ज्या दोन गाद्या आहेत, त्यातील कोल्हापूरची गादी सध्या महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे दुसऱ्या गादीला साथ दिली नाही, असं चित्र तयार व्हायला नको, म्हणून आमच्या पक्षाच्या पार्लामेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात आम्हाला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. परभणीची जागाही आमच्या वाट्याला आली होती. मात्र राजकारणात सोशल इंजिनिअरिंग गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही ती जागा रासपच्या महादेव जानकर यांना सोडली," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत कोणत्या १५ जागा मिळाल्या?

रामटेक 
बुलढाणा 
यवतमाळ वाशीम 
हिंगोली 
कोल्हापूर 
हातकणंगले
संभाजीनगर 
मावळ 
शिर्डी 
नाशिक 
कल्याण 
ठाणे 
मुंबई उत्तर पश्चिम 
मुंबई दक्षिण मध्य 
मुंबई दक्षिण
 
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या जागावाटपात मिळालेल्या जागा

बारामती
शिरूर
रायगड 
धाराशिव

Web Title: Eknath ShindeShiv Sena got 15 seats and Ajit Pawars NCP got four seats in the seat sharing of mahayuti for Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.