सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

By सोमनाथ खताळ | Published: May 15, 2024 11:41 PM2024-05-15T23:41:32+5:302024-05-16T00:07:34+5:30

महिलेसह तिघे जखमी : गावात पोलिसांची कुमक, तणावपूर्ण शांतता

posts on controversial social media; Stone pelting storm in Nandurghat in two groups | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

बीड : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरून दोन गट आमने-सामने आले. क्षणात एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक केली. यामध्ये एका महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केजसह जिल्ह्यातील पोलिसांची कुमक गावात पोहोचली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती.

गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. ही पोस्ट वादग्रस्त असल्याने दुसऱ्या गटातील लोक आक्रमक झाले. बोलता बोलता वाद वाढत गेला आणि हाणामाऱ्या झाल्या. त्यानंतर नांदुरघाटसह आजूबाजूच्या गावांतील लोक नांदुरघाटमध्ये पाेहोचले. त्यानंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला दगड लागला असून त्याला दोन टाके पडले आहेत. तसेच महिलेच्याही नाकाला गंभीर जखम झाली आहे. तिसरी व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. 

या सर्वांवर नांदुरघाटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच केजचे सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मिणा, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे फोर्स घेऊन गावात पोहोचले. बळाचा वापर करत जमाव पांगवला. त्यानंतर गावासह परिसरातील गावातील नागरिकांशी संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजेपर्यंत गावात पोलिसांची मोठी फौज होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिसांत नोंद झाली नव्हती. गावात तणावपूर्ण शांतता होती.

सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर दोन गट समोरासमोर भिडले. दगडफेकही झाली. माहिती मिळताच फोर्ससह गावात पोहोचलो. दगडफेकीत एका महिलेसह तिघे किरकोळ जखमी आहेत. सध्या गावात फोर्स असून शांततेचे आवाहन केले आहे.
-प्रशांत महाजन, पोलिस निरीक्षक, केज

Web Title: posts on controversial social media; Stone pelting storm in Nandurghat in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.