दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 09:52 PM2024-05-15T21:52:52+5:302024-05-15T22:06:15+5:30

"फक्त स्वत:च्या इगोसाठी आमचं सरकार पाडलं, पण भाजपचे मूळ कार्यकर्ते आता कुठे आहेत?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

In an attempt to end the two parties the BJP itself was ended Aditya Thackerays attack on devendra Fadnavis | दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 

दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 

Aditya Thackeray ( Marathi News ) : महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत निशाणा साधला आहे. "महाराष्ट्राचं वाटोळंच करायचं होतं तर भाजपाने सत्ता काबीज का केली? या सरकारपेक्षा आमचं सरकार चांगलं होतं. केंद्रात तुमचं सरकार असलं तरी आमचं इंजिन इथं सुरू होतं ना? तुमचं कितीही चाकी इंजिन असलं तरी ते फेल होतंय ना? दोन पक्ष संपवायचे म्हणून मी आलो, असं तुम्ही म्हणता. पण या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवलं," असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी 'लोकमत डिजिटल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महायुती सरकारवर चौफेर टीका केली. "भाजपसोबत एकनाथ शिंदे गटाचे आमदार गेले आणि नंतर अजित पवार यांच्या गटाचेही आमदार गेले. भाजपला सर्वाधिक धोका कोणत्या गटाकडून आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, "भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच सगळ्यांना धोका आहे. मी भाजपच्या नेत्यांची एक यादी तुम्हाला देतो, आताच्या काळात तुम्हाला भाजप नेत्यांची प्रतिक्रिया घ्यायची असेल तर कोणती नावे समोर येतात? बाहेरच्या पक्षांतून आलेले नेतेच पुढे आहेत. सगळेच्याच सगळे २०१९ मध्ये आयात केलेले आहेत. पंकजाताईंना आता उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या मनात काय खदखद आहे ती त्यांना विचारा, पूनमताई कुठे आहेत ते विचारा, प्रकाश मेहता कुठे आहेत, राज पुरोहित कुठे आहेत ते विचारा, एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय करण्यात आलं? दोन पक्ष संपवण्यासाठी मी आलो, असं तुम्ही म्हणालात. पण त्या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवलं. मूळ भाजप आता कुठे आहे? आताच्या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत ते २०२२ मध्ये आयात केलेले आहेत. त्यांच्यासोबतचे १० आमदार मंत्री झाले. अजित पवारांसोबतचे ९ आमदार मंत्री झाले. भाजपचे १० मंत्री आहेत, पण त्यातलेही फक्त ६ मूळचे भाजपचे आहेत. फक्त स्वत:च्या इगोसाठी आमचं सरकार पाडलं, पण भाजपचे मूळ कार्यकर्ते आता कुठे आहेत?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
 
राज ठाकरेंवरही केलं भाष्य

माझ्या पक्षाचे सहा नगरसेवक फोडून फोडाफोडीच्या राजकारणाला उद्धव ठाकरे यांनीच सुरुवात केली होती, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच एका सभेतून केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून २० वर्षं झाली. मात्र एक अशी घटना सांगा की, आम्ही त्यांच्यावर टीका केली. काही नात्यांवर आपण बोलायचं नसतं, असं घरातून सांगितलं आहे. आमच्याकडे मनसेचे जे नगरसेवक आले ते नंतर निवडून आले, त्यातले काही आमदारही झाले होते. आता आमच्यातून गेलेल्या गद्दारांची जशी स्थिती झालीय, तशी स्थिती त्या नगरसेवकांची झाली नव्हती," असं स्पष्टीकरण आदित्य यांनी दिलं आहे.  

२१ जागांवरील उमेदवार निवडीवर तुम्ही समाधानी आहात का?

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. या २१ जागांवरील उमेदवार निवडीवर तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर आदित्य यांनी म्हटलं की, "उमेदवार निवडीवर आम्ही नक्कीच समाधानी आहोत आणि फरक हाच आहे की, आमचे जे २१ उमेदवार आहेत ते पक्षातून आले आहेत, जनतेतून आले आहेत, मुंबईत ठरवले गेले आहेत, मातोश्रीवर ठरवले गेले आहेत. मात्र गद्दार गँगचे जे उमेदवार आहेत ते ठरवण्यासाठी त्यांना किती वेळा दिल्लीत जावं लागलं? किती वेळा बाहेर थांबावं लागलं? आणि मुख्य म्हणजे कोणत्या पक्षाने ते उमेदवार ठरवले? त्यांच्याकडे तर काही लोक असे आहेत की ज्यांना उद्धवसाहेबांनी पाच-सहा वेळा खासदार बनवलं, मात्र तिकडं गेल्यावर राखी बांधूनही त्यांना तिकीट मिळालं नाही." 

ठाणे किंवा कल्याणमधून लोकसभा निवडणुकीला का उभे राहिला नाहीत?

"पिक्चर अभी बाकी है! लोकसभा हा एक आवडता प्लॅटफॉर्म आहेच, तुम्ही तिथे जे बोलता ते देशभर जातं. मात्र त्याच बरोबरीने आपला महाराष्ट्र आहे. सध्याच्या स्थितीत तरी महाराष्ट्रात मी काम करणं योग्य आहे. कारण या लोकांना ज्या प्रकारे मागील अडीच वर्षांत महाराष्ट्र मागे नेला आहे, आमचं महाविकास आघाडीचं आल्यानंतर जी काही जबाबदारी मिळेल, ती आमदार म्हणून असेल किंवा इतर काही...त्या माध्यमातून मला महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे, देशभर पोहोचवायचा आहे. कोर्टाकडून बाद झाले नाहीत, तर एकनाथ शिंदेंना निवडणूक लढता येईल. भाजपा जर डोक्यावर बसलं नाही तर निवडणूक राज्यात होईल. पहिलं चॅलेंज देतो की माझ्याशी महाराष्ट्राबद्दल चर्चा करा. जिथून लढवायची तिथून निवडणूक लढवू," अशी भूमिकाही आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.

Web Title: In an attempt to end the two parties the BJP itself was ended Aditya Thackerays attack on devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.