“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 05:33 PM2024-05-01T17:33:27+5:302024-05-01T17:34:27+5:30

Congress Nana Patole News: लोकसभेची ही निवडणुक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole appeal to vote maha vikas aghadi and india alliance for lok sabha election 2024 | “लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन

“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन

Congress Nana Patole News:काँग्रेसने जनतेला गॅरंटीकार्ड दिले आहे, गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, एमएसपीचा कायदा आणणार, शेती जीएसटी मुक्त करणार, जातनिहाय जनगणना करणार आहे. लोकसभेची ही निवडणुक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची केंद्रात सत्ता आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. या सभेत नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला. भाजपाने जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप केले, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला

भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. पण आरक्षण दिले नाहीच उलट राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला. भाजपा व आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आली तर ते संविधान बदलणार व संविधानाने दिलेले आरक्षणही संपवणार. भाजपने २०१४ साली खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली, २०१९ मध्ये पुलवामा येथे हल्ल्यात ४० जवान शहिद झाले, हा हल्ला कोणी त्याचा तपास आजही लागलेला नाही. कांदा निर्यात बंदी उठवताना गुजरातची उठवली पण महाराष्ट्रातील कांदा निर्यातला परवानगी दिली नाही. भाजपा सरकारने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले. राम मंदिर उद्घाटन व संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी असल्याने भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान केला, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, लातूरात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल भाष्य करण्यात आले नाही. २०१४ च्या निवडणुकीत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून मेट्रोचे कोच तयार करू असे भाजपवाले  म्हणाले होते, २०१९ ला त्याच फॅक्टरीतून बुलेट ट्रेन कोच तयार करू असे म्हणाले आणि आता २०२४ ला ते त्या फॅक्टरीतून वंदे भारत कोच तयार करू असे म्हणतात. पण महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार म्हणून या फॅक्टरीतून कोच बाहेर काढतील, असे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: congress nana patole appeal to vote maha vikas aghadi and india alliance for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.