३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:05 PM2023-08-09T14:05:13+5:302023-08-09T14:16:16+5:30

राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारवर थेट हल्लाबोल केला. मणिपूरवरून विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ते बोलत सभागृहात बोलत होते. तुम्ही भारतमातेची हत्या केलीय, तुम्ही देशद्रोही आहात असा घणाघात राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला.

नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नाही. केवळ २ लोकांचं ऐकतात. रावण २ लोकांचे ऐकत होता. मेघनाद आणि कुंभकर्ण...तसेच नरेंद्र मोदीही २ लोकांचे ऐकतात ते म्हणजे अमित शाह आणि अदानी

मी मणिपूरमधील पीडित महिलेशी बोललो. तिच्या छोट्या मुलाला डोळ्यादेखत गोळी मारली. मृतदेहासोबत तिने रात्र काढली. मी मणिपूरला गेलो, तिथल्या रिलिफ कॅम्पमधील महिला, मुलांशी बोललो, जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नाही.

भारत मातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केलीय. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून भारत मातेची हत्या केलीय. तुम्ही देशद्रोही आहात, देशभक्त नाही. तुम्ही देशाची हत्या मणिपूरमध्ये केलीय त्यामुळे पंतप्रधान मणिपूरला गेले नाही.

मणिपूरमध्ये दुसऱ्या महिलेला विचारले, तुमच्यासोबत काय झाले? तिच्यासोबत जे घडले ते आठवून तिला सहन झाले नाही. माझ्यासमोर ती कोसळली आणि बेशुद्ध पडली.

शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. हिंदुस्तानच्या मोठ्या उद्योगपतींना हिसकावले. मी शेतकऱ्याशी बोललो, त्याच्या मनातील दु:ख मी समजून घेतले. त्याची भूक मला कळाली. त्यानंतर भारता यात्रा बदलली, मला गर्दीचा आवाज ऐकायला येत नव्हता. त्या व्यक्तीचा आवाज ऐकायला येत होता.

मी अनेक वर्ष दररोज ८-१० किमी धावतो, २५ किमी धावल्यानं काय होणार असं वाटायचे. माझ्या मनात अहंकार होता. परंतु भारत जोडो यात्रेने हा अहंकार संपवला. एक सेकंदात सर्वकाही बदलले. प्रत्येक पाऊलावर वेदना होती. माझा अहंकार संपला होता.

२-३ दिवस माझे गुडघे दुखायचे. मी उठल्यावर वेदना व्हायच्या. रोज घाबरून जायचो, उद्या चालायला मिळेल का? जेव्हा ही भीती वाढायची तेव्हा कुठली ना कुठली शक्ती मला मदत करत होती.

मी आज तुमच्यावर सत्ताधाऱ्यांवर आक्रमक करणार नाही. १-२ गोळी मारेन परंतु जास्त हल्ला करणार नाही. मला लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले त्याबद्दल मी आभार मानतो.

आज भाजपाच्या माझ्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. कारण माझे भाषण अदानी केंद्रीत नसणार आहे. मी मागच्या वेळी अदानींवर बोललो म्हणून भाजपाला त्रास झाला. कदाचित वेदना झाल्या. त्याबद्दल मी माफी मागतो. परंतु मी जे बोललो सत्य बोललो असंही राहुल गांधी म्हणाले.