Omicron Variant : 2022मध्ये कोरोना संकट संपवायचं असल्यास वेगानं करावं लागेल 'हे' काम; WHOकडून मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:14 PM2021-12-22T13:14:10+5:302021-12-22T13:38:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता ख्रिसमस आणि नववर्षावर देखील ओमायक्रॉनचं सावट आहे.

जगभरात ओमायक्रॉनचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता ख्रिसमस आणि नववर्षावर देखील ओमायक्रॉनचं सावट आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट हा अत्यंत वेगाने पसरत असून तो घातक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना सतर्क करत धोक्याचा इशारा दिला आहे.

जगभरातील सरकारांनी आता कोरोना या महाभयंकर संकटाचा अंत करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी 2022 या वर्षात आपण कोरोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी असं म्हटलं आहे.

"गेल्या आठवड्यात, WHO ने नोव्हावॅक्सच्या परवान्याखाली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या नवव्या लसीसाठी आपत्कालीन वापर सूची जारी केली. ही नवीन लस COVAX पोर्टफोलिओचा भाग आहे."

"जागतिक स्तरावर लसीकरण लक्ष्य साध्य करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल" अशी आशा WHO प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जगभरात या वर्षी तब्बल 3.3 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी साथीच्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे असंही म्हटलं आहे,

"2020 मध्ये HIV, मलेरिया आणि क्षयरोगाच्या एकत्रित मृत्यूंपेक्षा जास्त मृत्यू एकट्या कोरोनामुळे झाले आहेत. दर आठवड्याला सुमारे 50 हजार लोकांनी जीव गमावला. तर, या महामारीच्या काळात अनेक मृत्यूंची नोंद झालेली नाही, त्यामुळे हा आकडा मोठा असू शकतो"

"ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा जास्त पटीने होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे आणि जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि तो अभूतपूर्व वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे.

डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस यांनी जगातील सध्याच्या कोरोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेडोस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी कोरोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगामधील 89 देशांमध्ये कोरोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे.

कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहाता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर आणखी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

ओमायक्रॉनचं जागतिक पातळीवर वेगाने पसरणं किंवा 30 हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा कोरोना साथीचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.

नवा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याचं अनेक संशोधकांचं मत आहे. मात्र, याबाबत डॉ. टेड्रॉस यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी अनेकांना यातून दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.