रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 01:54 PM2024-06-16T13:54:51+5:302024-06-16T13:59:42+5:30

खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा फोन ईव्हीएमसोबत का जोडण्यात आला होता असा सवाल आता काँग्रेसने केला आहे.

Congress question about NDA candidate Ravindra Waikar relative mobile phone being linked to EVM | रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

Ravindra Waikar News : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात लागलेला निकाल वादात सापडला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव केला. मात्र या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी केलाय. अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परवानगी नसताना वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या खोलीत मोबाईलचा वापर केला होता. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्याने त्यांना मोबाईल पुरवला होता. त्यानंतर मिळालेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी मतमोजणी केंद्राच्या खोलीमध्ये परवानगी नसताना मोबाईल फोनचा वापर केला गेल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे भरत शाह यांच्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पोलिसांनी आता याप्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे.

खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आलं आहे. पोलीस तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले. पंडीलकर यांच्याकडे जो मोबाईल सापडला तो दिनेश गुरव यानेच त्यांना दिला होता. हा मोबाईल ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला होता. पोलिसांनी हा मोबाईल जप्त करुन  फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. 

या प्रकरणावरुन आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवं असं म्हटलं आहे. ईव्हीएमशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. "मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. एनडीएचा हा उमेदवार केवळ ४८ मतांनी विजयी झाला आहे.अशा परिस्थितीत प्रश्न आहेत. एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे," असं काँग्रेसने म्हटलं आहे.

आता लोकशाहीसोबत गद्दारी - आदित्य ठाकरे

"उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दर उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण तडजोड करुन निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की हा आणखी एक चंदिगडमधील गोंधळासारखा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आपली लोकशाही संपवायची आहे. त्यांनी आताची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या याच सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे," असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Congress question about NDA candidate Ravindra Waikar relative mobile phone being linked to EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.