Omicron Variant: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:56 PM2021-12-15T13:56:03+5:302021-12-15T14:00:51+5:30

Coronavirus Omicron Variant in India: दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देश चिंतेत आहेत. कोरोना लसीवरही ओमायक्रॉन व्हेरिएंट मात देत असल्याने डोकेदुखी वाढली आहे.

जगभरात दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत ४० हून अधिक देशात ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरला असून डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

भारतात ओमायक्रॉनचं सावट असताना कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. वीके पॉल यांनी केलेले विधान कोट्यवधी भारतीयांना टेन्शन देणार ठरणार आहे. भविष्यात भारतीय लसी ओमायक्रॉनच्या प्रभावाखाली कमकुवत होऊ शकतात असा धोका त्यांनी वर्तवला आहे.

देशात लसीसाठी असं व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे. ज्यात व्हायरसच्या बदलत्या व्हेरिएंटसोबत आवश्यक बदल करता यावेत. भारतात ज्या वेगाने ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे हे पाहता सौम्य आणि मध्यम स्वरुपाचं संक्रमण पसरू शकतं. त्या स्थितीला एंडेमिसिटी असं म्हणतात.

डॉ. वीके पॉल म्हणाले की, संभाव्य परिस्थिती पाहता आपल्या लसींचा प्रभाव कमी होऊ शकतो. ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर मागील ३ आठवड्यात असे अनेक संकेत समोर येत आहेत. ज्यात काही वास्तविकही असू शकतं. अद्यापही त्याबद्दल स्पष्ट चित्र दिसत नाही.

इतकचं नाही तर आवश्यकतेनुसार, लसीच्या संशोधनावर तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर कोरोना महामारीच्या प्रभावी अंदाजापासून वाचण्यासाठी औषध निर्मितीसाठी मजबूत धोरण आखायला हवं. विज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं गरजेचे आहे.

भारतातील प्रौढ लोकसंख्येचे दोन्ही डोस पूर्ण व्हायला हवेत. जे आपल्या लसीकरण अभियानात आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी पाऊल आहे जे सध्याच्या काळात आपण उचलू शकतो. जागतिक स्तरावर ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमणाचा वेग पाहता हे गरजेचे आहे.

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या अद्याप दोन आकड्यांत असली तरी त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल राजस्थान, दिल्ली व गुजरात या तीन राज्यांचा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने या तीन राज्यांत चिंता व भीती वाढली आहे.

दुबईहून सोमवारी महाराष्ट्रात आलेले दोघे ओमायक्रॉनचे रुग्ण निघाले आहेत. देशात ओमायक्रॉनचे एकूण ४९ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २० एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड भागातच अधिकांश रुग्ण आढले आहेत.

दिल्ली व राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राजस्थानमध्ये ९ तर दिल्लीत ६ रुग्ण आढळले असून, गुजरातमध्ये ही संख्या ४ आहे. कर्नाटकात तीन तसेच केरळ, आंध्र प्रदेश तसेच चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरू आहेत.

मागील २४ तासांत आढळलेला १ रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून केनया, अबुधाबी, दिल्ली या मार्गे गुजरातमध्ये आला. तो ३ डिसेंबर रोजी गुजरातेत आला. ओमायक्रॉन व्हेरिएंट हा कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न हे केले जात आहेत

Read in English