चिंताजनक! अचानक थंडी वाजू लागली, अंग कापू लागले अन् तापही भरला; Black Fungus वरील इंजेक्शनचा भयंकर दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:54 AM2021-06-08T10:54:49+5:302021-06-08T11:07:59+5:30

Black Fungus And Amphotericin-B : ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचा आकडा 2,89,96,473 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 86,498 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2123 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,51,309 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.

ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार केले जात असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचारासाठी वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचा वाईट परिणाम होत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 27 रुग्णांना अँफोटेरिसिन-बी (Amphotericin-B) इंजेक्शन दिल्यानंतर याचे गंभीर दुष्परिमाण दिसू लागले आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे याचा वापर थांबवण्यात आला आहे.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच जवळपास 350 अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन पाठवण्यात आले.

ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये अँम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. हे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी, ताप, उलटीची समस्या उद्भवू लागली. इंदोर, सागर आणि जबपूरमध्ये इंजेक्शनचे असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत.

42 पैकी 27 रुग्णांना शनिवारी अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन देण्यात आलं. मात्र त्यानंतर गंभीर दुष्परिणाम दिसून आला आहे. काहींना खूप ताप आला. तसेच त्यांचे अंग थरथर कापू लागले. अचानक थंडी वाजू लागली आणि उलट्या देखील झाल्या आहेत.

रुग्णांवर या इंजेक्शनचा दुष्परिणाम दिसून येताच हे औषध देणं थांबवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की रुग्णांवर इंजेक्शनचं रिअॅक्शन दिसून येत आहे. आता त्यांना इंजेक्शनऐवजी दुसरं औषध दिलं जात आहे अशी माहिती दिली.

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीत ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे.

वाराणसीत ब्लॅक फंगसमुळे 24 तासांत आठ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भयंकर प्रकार म्हणजे ऑपरेशन करून 30 रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत.

ब्लॅक फंगसच्या रुग्णांची एकूण संख्या ही आता 145 वर पोहोचली आहे. बीएचयूच्या सर सुंदर लाल रुग्णालयात खास दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 80 बेड असून ते आता फुल झाले आहेत.

उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये एक धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. एकाच रुग्णाला तीन प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. म्हणजेच व्हाइट फंगस, ब्लॅक फंगस आणि यल्लो फंगस अशा तिन्ही प्रकारच्या फंगचा एकाच वेळी संसर्ग झाला आहे.

डॉक्टरांनी रुग्णाच्या इतरही चाचण्या केल्या आणि त्यामध्ये समोर आलेल्या रिपोर्टमधून रुग्णाला एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तीन तास चाललेल्या सर्जरीनंतर या रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.