'सैराट' फेम बाळ्या, सल्या आणि अनी सध्या काय करतात? कोणी अभिनय तर कोणी करतंय वकिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:16 PM2024-04-29T12:16:45+5:302024-04-29T12:28:20+5:30

आर्ची आणि परश्याला तर सगळेच ओळखतात. पण सिनेमातील त्यांचे जवळचे मित्र आता काय करताएत?

2016 साली आलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाने मराठी मनोरंजनविश्वात इतिहास घडवला. आर्ची-परश्याची जोडी कमालीची हिट झाली. आजही सिनेमाची आणि यातील कलाकारांची तेवढीच चर्चा असते.

आर्ची आणि परश्या या दोन मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारांशिवाय इतरही कलाकार गाजले. आर्चीची मैत्रीण अनी आणि परश्याचे मित्र सल्या-बाळ्या सुद्धा तितकेच हिट झाले.

नागराज मंजुळेंनी कोणत्याही स्टार कलाकाराला न घेता छोट्याशा गावातील मुलांना या सिनेमात संधी दिली होती. 'सैराट'सिनेमातील ही सर्व कलाकार मंडळी सध्या काय करतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

आर्ची म्हणजेच म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) स्टार कलाकार आहे. सैराट मुळे लोकप्रियता मिळाल्यानंतर तिने अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. आज रिंकू आघाडीची अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'झिम्मा 2'सिनेमातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.

परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरही (Akash Thosar) अभिनयक्षेत्रात काम करत आहे. तरी त्याची गावाशी जोडलेली नाळ कायम आहे. आकाशनेही अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. लवकरच तो बाल शिवाजी सिनेमात दिसणार आहे.

तर सिनेमातील इतर कलाकारांपैकी एक असलेली आर्चीची मैत्रीण अनी. ती कायम आर्चीसोबत असायची. आर्ची ट्रॅक्टर घेऊन थेट शेतात निघाली तेव्हा अनी तिच्यासोबत होती. अनी थोडी घाबरायची तर आर्ची मात्र बिंधास्त असायची. ही अनी म्हणजेच अभिनेत्री अनुजा मुळे (Anuja Mule) आता काय करते माहितीये?

अनीने हा एकच सिनेमा केला असून नंतर ती पुन्हा अभिनय क्षेत्रात आली नाही. सैराटमध्ये तिच्याही अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. अनी सध्या वकिलीचं शिक्षण घेत आहे.

परश्या...आर्ची आली आर्ची...असं ओरडून सांगणारा परश्याचा मित्र बाळ्या आठवतोय? त्याचं नाव तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde). तानाजीला खऱ्या आयुष्यातही पायाचा त्रास आहे. त्याच्या पायावर आतापर्यंत 7 वेळा शस्त्रक्रिया झाल्याचं त्याने सांगितलं होतं.

तर तानाजीही अभिनेता आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये तो छोट्या छोट्या भूमिका करतो. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'नवरदेव बीएससी अॅग्री' सिनेमातही तो झळकला.

परश्याचा आणखी एक मित्र म्हणजे सल्या. याचं खरं नाव अरबाज शेख (Arbaaz Shaikh). अरबाज आणि तानाजी आजही घट्ट मैत्री आहे. अरबाजनेही बस्ता, फ्री हिट दणका सारख्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमातही त्याने भूमिका साकारली आहे.