'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:47 PM2024-05-15T13:47:39+5:302024-05-15T14:06:16+5:30

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.

Maharashtra Politics Devendra Fadnavis says after taking Ajit Pawar with him BJP voter upset | 'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis On Ajit Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस उरले आहेत. मात्र त्याआधी प्रचारासोबत राजकीय नेत्यांच्या मुलाखतींमुळे वातावरण तापलं आहे. या मुलाखतींमधून राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांसह धक्कादायक गौप्यस्फोट देखील करत आहेत. अशातच दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत झालेल्या अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता असे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. 

अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोनवेळा सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीसोबत जात उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मंत्रि‍पदे देखील मिळाली. मात्र दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली तेव्हा भाजपा समर्थक नाराज झाले असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसेच शिंदेंच्या शिवसेनेसह झालेली युती ही भावनिक असून राष्ट्रवादीसह झालेली युती राजकीय असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.

"अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुतीत आल्याने सुरुवातीला आमचा मतदार रागावला होता. पण अखेरीस अजित पवारांच्या वर्तनामुळे आता अवमान होणार नाही याची खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळे भाजपचा मतदार खडकवासला मतदारसंघात कसा मतदान करतो, हे बारामतीच्या निकालात दिसेल," असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मोदींची लोकप्रियता जात आणि भाषेच्या पलीकडे 

"मराठी मतदार फक्त शिवसेनेच्या पाठीशी आहे हा एक समज आहे. २०१७ च्या नागरी निवडणुकीत आम्ही त्यांच्या ८४ विरुद्ध ८२ जागा जिंकल्या. २०१४ मध्ये आम्ही विधानसभा निवडणूक वेगळी लढवली आणि भाजपला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. २०१९ मध्ये आम्ही युती म्हणून लढलो आणि सेनेने आमच्यापेक्षा एक जागा जास्त लढवली पण त्यांना पाच जागा कमी मिळाल्या. मी पण मराठी आहे आणि आशिष शेलारसुद्धा. लोकांनी आम्हाला वारंवार मतदान केले आहे. मोदींची लोकप्रियता जात आणि भाषेच्या पलीकडे आहे," असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुस्लिम मतांनी उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

"काँग्रेसपेक्षा सेनेकडून तुष्टीकरण जास्त केले जात आहे. शिवसेनेच्या कार्यालयात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. ठाकरेंच्या सभेत शिवसेनेची शाल घालणाऱ्यांकडून अल्लाह-हो-अकबरच्या घोषणा दिल्या जात आहेत. मराठी मतांची उणीव मुस्लिम मतांनी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे मला वाटते," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 

Web Title: Maharashtra Politics Devendra Fadnavis says after taking Ajit Pawar with him BJP voter upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.