भीषण अपघात: घाटातून जाणाऱ्या कारवर कोसळली दरड, कार कापून बाहेर काढावा लागला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 02:21 PM2021-07-21T14:21:23+5:302021-07-21T14:26:48+5:30

Accident in Nainital: अपघातात पतीचा जागीच मृत्यू, तर पत्नीला गंभीर अवस्थेत नैनीतालमधील रुग्णालयात भरती करण्यात आले.

नैनीताल: उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये एक भीषण अपघात झाला. नैनीतालपासून 12 किलोमीटर दूर बजून परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे. यादरम्यान, घाटातून जाणाऱ्या एका कारवर मोठी दरड कोसळली.

दरड इतकी मोठी होती की, कारचा अक्षरशः चुराडा झाला.घटनास्थळावर आलेल्या बचाव पथकाला कार कापून आतमधील दांपत्याला बाहेर काढावे लागले.

या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नीला गंभीर अवस्थेत नैनीतालमधील बीडी पांडे रुग्णालयात भरती करण्यात आले.

गुड़गाववरुन हुंडाई क्रेटा (एच.आर.26 सी.डब्ल्यू.0789) नैनीतालला फिरण्यासाठी आलेल्या हनुमंत तलवार आणि मीना तलवार यांच्या कारवर नैनीतालमधील बजूनजवळ एक मोठी दरड कोसळली.

ही दरड कारच्या उजव्या बाजुवर कोसळली, ज्यात हनुमंत तलवार यांचा जागीच मृत्यू झाला तर मीना तलवार गंभीर जखमी झाल्या.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले

गाडीची अवस्था पाहून पोलिसही हैरान झाले होते. कार पूर्णपणे चक्काचुर झाल्यामुळे बचाव पथकाला मोठ्या कटरने कार कापून तलवार दांपत्याला बाहेर काढावे लागेल.

तलवार दांपत्याला बाहेर काढल्यानंतर हनुमंत तलवार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले, तर मीना तलवार यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासन अलर्ट झाले असून, पर्यटकांना भूस्खलन होत असलेल्या परिसरात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी याच जागेवर एका वॅगनआर कारवर मोठी दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघंचा मृत्यू झाला होता.