Independence Day 2021, PM Narendra Modi Speech: लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना मोदींनी केल्या या मोठ्या घोषणा, हे होते भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 10:31 AM2021-08-15T10:31:38+5:302021-08-15T10:48:01+5:30

Independence Day 2021 : PM Narendra Modi Speech: देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. मोदींनी आज केलेल्या भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणांचा घेतलेला हा आढावा

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवरून देशवासियांशी संवाद साधला. तसेच काही मोठ्या घोषणाही केल्या. मोदींनी आज केलेल्या भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणांचा घेतलेला हा आढावा

तप्रधान नरेंद्र मोदींनी सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवला. पंतप्रधान मोदींनी यावेळी आपल्या संबोधनाला सुरुवात करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी तसेच इतर महापुरुषांचा विशेष उल्लेख केला.

नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून खास कौतुक केले.

केंद्र सरकारने १४ ऑगस्ट रोजी फाळणी विभिषिका दिन साजरा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच फाळणीचे धाव देशवासियांच्या मनात अद्यापही ताजे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोरोनाच्या संकटाचाही मोदींनी खास उल्लेख केला. ते म्हणाले, विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. मात्र देशवासियांनी संयम आणि धैर्याने या संकटाचा सामना केला आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील ५४ कोटी हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

२१ व्या शतकामध्ये भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य आणि पूर्ण वापराची आवश्यकता असल्याचे मोदींनी सांगितले. त्यासाठी जे घटक, क्षेत्र मागे आहे त्यांची हँड होल्डिंग करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

आता आपण सेचुरेशनच्या दिशेने गेले पाहिजे. सर्व गावांमध्ये रस्ते असावेत, सर्व कुटुंबांकडे बँक अकाऊंट असावेत. सर्व लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत कार्ड असावे, सर्व पात्र लाभार्थ्यांकडे उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असावे, असेही मोदींनी सांगितले.

देशातील लहान शेतकरी हा देशाची शान ठरावा हे आमचे स्वप्न आहे. देशातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.  येणाऱ्या वर्षांमध्ये देसातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीला अधिक वाढवावे लागेल. त्यांना अधिक सुविधा द्याव्या लागतील. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ आठवडे चालणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान देशातील विविध भागांना ७५ वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून जोडणार 

भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गतिशक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. १०० लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्टर प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल.

देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही मिळणार प्रवेश

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची एक अजून महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये स्पोर्ट्सला एक्स्ट्रा करिक्युलर ऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर त्यामध्ये क्रीडा हेसुद्धा महत्त्वाचे प्रभावी माध्यम आहे

 दहशतवाद आणि विस्तारवाद हे भारतासमोरील मोठे आव्हान. भारत या दोन्ही आव्हानांचा प्रभावीपणे सामना करत आहे. देशाच्या लष्कराचे हात बळकट करण्यामध्ये आम्ही कुठलीही कुचराई करणार नाही, असा मी देशाच्या नागरिकांना विश्वास देतो

राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा, वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मोठी घोषणा

यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है... या कवितेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली भाषणाची सांगता