धक्कादायक! "पिढ्यानपिढ्या सोबतच राहणार कोरोना; नोव्हेंबरपर्यंत येणार तिसरी लाट", जीव्ही मूर्ती यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 03:59 PM2021-05-27T15:59:26+5:302021-05-27T16:09:21+5:30

प्रोफेसर मूर्ती म्हणाले, धोका कमी करायचा असेल, तर फेब्रुवारी 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध आवश्यक...!

हैदराबाद येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे (IIPH) संचालक प्रो. जीव्ही एस मूर्ती यांनी कोरोनासंदर्भात मोठा दावा केला आहे. फ्लू प्रमाणेच कोरोनाही (Covid-19) पिढ्यानपिढ्या येथे राहील. एवढेच नाही, तर पुढची लाट नोव्हेंबर महिन्यापर्यंत येईल, असा धक्कादायक दावाही मूर्ती यांनी केला आहे.

प्रोफेसर मूर्ती यांनी म्हटले आहे, की विविध राज्यांतून येत असलेल्या आकडेवारीचा विचार करता, जून अखेरपर्यंत दक्षिण आणि पश्चिम भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी येईल. तर उत्तर आणि पूर्व भारतात जुलैच्या मध्यापर्यंत संक्रमित रुग्णांच्या संख्येत कमी दिसू शकते.

'सभांमुळे अधिक पसरला कोरोना' - मूर्ती म्हणाले, महामारीच्या काळात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभांना परवानगी देणे, हे कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरण्याचे मुख्य कारण आहे.

कोरोनाही फ्ल्यू प्रमाणेच राहणार - मूर्ती म्हणाले, कोरोना व्हायरस येथे दीर्घकाळ राहणार आहे. जेव्हा एखादे संक्रमण समाजासमोर येते, तेव्हा ते हळू-हळू पसरते. आणि नंतर स्थानिक पातळीवर वाढते. फ्लू आपल्यासोबत अनेक पिढ्यापासून आहे आणि असेच कोरोनासोबतही होणार.

'अँटीबॉडीजचा काळ किती'? मूर्ती म्हणाले, या संक्रमणाचा विचार करता, संवेदनशील लोक जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येतील, तेव्हा ही महामारी पसरेल. ते म्हणाले, आपल्याला माहितच आहे, की कोविड-19 संक्रमणानंतर रोग प्रतिकार शक्ती केवळ तीन ते सहा महिनेच राहते. यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा कोरोना संक्रमणाची शक्यता असते.

'5-6 महिन्यात पुन्हा पुढची लाट येणार' - आपण पाहत आहोत, की मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेतेही दुसऱ्यांदा संक्रमित होत आहेत. अर्थात कुणातही स्थायी रोग प्रतिकार शक्ती नाही. तसेच कोरोनाची पुढची लाट येण्यासाठी पाच ते सहा महिने लागतील आणि तोपर्यंत लोकांची रोग प्रतिकार शक्ती पुन्हा एकदा संपलेली असेल, असेही मूर्ती म्हणाले.

'लसीकरणानंतर प्रभावी सामना शक्य होईल' - प्रोफेसर मूर्ती म्हणाले, नोव्हेबर महिना पुन्हा एकदा चिंतेचा ठरू शकतो. महामारीत वयस्क लोक सर्वप्रथम मरतात. मात्र, प्रत्येक वेळी येणाऱ्या लाटेत मुलांसह मध्यम वयीन आणि तरुण लोक अधिक संक्रमित होतात आणि पुढील लाटेची हीच भीती आहे.

जर देशातील 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 80 टक्के लोकांचे नोव्हेंबरपर्यंत लसीकरण केले गेले, तर आपण कोरोना व्हायरसला पसरण्यापासून प्रभावीपणे रोखू शकतो, असेही मूर्ती म्हणाले.

'2022 पर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधांची आवश्यकता' प्रोफेसर मूर्ती म्हणाले, धोका कमी करायचा असेल, तर फेब्रुवारी 2022 पर्यंत मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

शाळा आणि कार्यालये पुरेशा खबरदारीनंतरच खुली केली जाऊ शकतात. असेही मूर्ती यांनी म्हटेले आहे.