चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:13 PM2024-06-17T12:13:20+5:302024-06-17T12:26:08+5:30

जसे वय वाढत जाते तशा महिलांना आरोग्याच्या मोठ्या समस्या संभवतात. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक होऊ शकते.

सर्वसाधारणपणे वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर महिलांना विविध आरोग्याच्या व्याधींना सामोरे जावे लागते. या वयात बहुतांशी महिला त्यांच्या कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदारीमध्ये व्यस्त असतात.

सांधेदुखी, पोट बिघडणे, वजन वाढणे, मधुमेह, दृष्टी कमी होणे, रक्तदाबाचे विकार जोडणे अशा अनेक समस्या या काळात बहुतांशी महिलांना होतात. त्यामुळे चाळिशी ओलांडल्यानंतर महिलांनी एकदा तरी संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

कुटुंब, करिअर, सामाजिक जीवन आणि अन्य जबाबदाऱ्यांमध्ये महिला अनेक वेळ व्यस्त असतात. त्यामुळे अनेकदा महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी महिलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

बहुतांश महिला आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्षित करून आपले काम सुरूच ठेवतात. परिणामी जसे वय वाढत जाते तशा त्यांना आरोग्याच्या मोठ्या समस्या संभवतात. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक होऊ शकते.

चाळिशीनंतर अनेक महिलांना थकवा जाणवायला लागत असतो. त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एकदा आरोग्याची तपासणी करून घ्यावी. कारण या वयातच बहुतांश आजारांना सुरुवात होत असते. जर त्या आजारांना त्यावेळीच निदान करून उपचार करणे सोपे होते.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कर्करोग या आजारसंबंधीच्या चाचण्या करून घ्याव्यात. तसेच सोनोग्राफी वर्षातून एकदा करावी. तसेच मासिक पाळी येते की नाही यावरही लक्ष ठेवावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व उपचार आणि निदान करून घ्यावेत असं डॉ. तुषार पालवे (स्त्रीरोग तज्ज्ञ, कामा हॉस्पिटल) यांनी म्हटलं आहे.

तपासणीदरम्यान महिलांमध्ये विविध व्हिटॅमिनची कमतरता आढळली. विशेष करून व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन - ड याची कमतरता अनेक महिलांमध्ये दिसून आली आहे. तसेच अनेक महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाणसुद्धा कमी असते.

अनेक महिलांचे चाळिशीनंतर केस गळण्यास सुरुवात होते. केसाची लांबी कमी होते. थायरॉईडच्या आजारात असे प्रकार घडतात. त्यामुळे थायरॉईड आहे किंवा अन्य काही समस्या आहे ते तपासून पाहणे गरजेचे आहे.

विशेष करून चाळिशीनंतर हाडांची दुखणी सुरू होतात. पाठ, मान, कंबर यांची दुखणी या काळातच सुरू होतात.

तरुणपणातच हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने एकादा तरी हृदयाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण याचीही चाचणी हृदयविकाराच्या आजाराच्या निदानास मदत होईल.