देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:13 PM2024-06-17T12:13:20+5:302024-06-17T12:16:10+5:30

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून ठाण्यात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलावण्यात आली होती. 

MP Naresh Mhaske campaigning for Niranjan Davkhare in Konkan Graduate Constituency, Devendra Fadnavis praised | देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा

देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा

ठाणे - विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. यात महायुतीकडून कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरेंना उमेदवारी मिळाली आहे. परंतु तत्पूर्वी मनसेनं अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची द्विधा मनस्थिती झाली होती. निरंजन डावखरे यांच्या प्रचारावेळी म्हस्केंनी बैठकीत हा किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी या संकटातून वाचलो असंही म्हस्के यांनी सांगितले. 

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, खासदारकीच्या निवडणुकीत अवघ्या १२ दिवसांत मला महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत करून निवडून आणलं. खासदारकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक लागली. निरंजन डावखरेंसोबत आमची चर्चा सुरू होती. कसं नियोजन करायचे, त्यात अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सगळ्यात पहिला माझ्या पोटात गोळा आला. अभिजीत पानसे, निरंजन डावखरे हे दोघेही माझे मित्र. दोघांनीही निवडणुकीत प्रचंड काम केले आहे. निकाल लागून ५-६ दिवस झालेले, त्यात सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्यामागे लागले होते. त्यावेळी मी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो. उत्तर काय देणार? असं त्यांनी सांगितले. 

तसेच निरंजन डावखरेला योग्य म्हटलं तर अभिजीतला राग येणार, अभिजीतला योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार, मी रवींद्र चव्हाणांना फोन केला, हे मिटवा लवकर...मी रोज निरंजनला फोन करायचो, हा विषय लवकर संपव, फडणवीस साहेबांना सांग..एकदा अभिजीतला फोन करून त्याचे मत परिवर्तन होतं का हे पाहिले. किती नोंदणी केली आहेस, निरंजनपेक्षा पुढचा आकडा अभिजीतनं सांगितला. मी म्हटलं आता वाटोळं झालं, करायचं काय..फडणवीस यांनी मला या सगळ्यात मोठ्या संकटातून वाचवलं असं खासदार म्हस्केंनी म्हटलं. 

त्याशिवाय महायुती म्हणून निरंजनचं काम करायचं आहे पण महायुतीत अभिजीत पानसेही आहेत. निरंजनचं काम केल्यानंतर अभिजीत पानसे मला गद्दार, ऐहसान फरामोश म्हणणार, अभिजीत लहानपणापासून मित्र आहे, या निवडणुकीत अभिजीतनं माझ्या प्रचाराचं डिझाईन करायचे काम केले. अविनाश जाधवचा चेहरा आठवला. आता करायचे काय, परंतु केवळ फडणवीसांनी भूमिका घेतली आणि अतिशय सलोख्याने आज आपण महायुतीत बसलो आहोत. निरंजन डावखरेंचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा उमेदवार कोण, तेदेखील कोणाला माहिती नाही असं नरेश म्हस्के म्हणाले.

दरम्यान, बऱ्याच जणांना ही निवडणूक माहिती नाही. पक्षाच्या वतीने त्या त्या विभागातील पदवीधरांची यादी दिली जाईल. पदवीधरांशी संपर्क करा, वेळ पालून त्यांच्याशी संपर्क साधा. पक्षाचे पदाधिकारी, विभागप्रमुख, नगरसेवक यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. 

Web Title: MP Naresh Mhaske campaigning for Niranjan Davkhare in Konkan Graduate Constituency, Devendra Fadnavis praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.