CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत 45% वाढ; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:25 AM2022-06-06T11:25:53+5:302022-06-06T11:49:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या एका आठवड्यात 25 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांनंतर एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. काही राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सोमवारी (6 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,518 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला असून 5,24,701 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. 10 राज्यांत रुग्णसंख्या वाढल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या एका आठवड्यात 25 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांनंतर एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहे. यावेळी 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशातील 10 राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यातील जवळपास 60 टक्के केसेस या फक्त केरळ आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. भारतात 7 मार्च ते 13 मार्चमध्ये 25000 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता 30 मे ते 5 जून पर्यंत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

केरळमध्ये एका आठवड्यात 8000 रुग्ण आढळले आहेत. हे गेल्या आठवड्याच्या तुलनेत 65 टक्क्यांहून अधिक आहेत. तर महाराष्ट्रात आठवड्याभरात 7253 नवे रुग्ण सापडले. गेल्या आठवड्यात 3142 रुग्ण आढळले होते.

देशात सर्वात जास्त रुग्ण हे केरळ 1,544, महाराष्ट्र 1494, दिल्ली 343, कर्नाटक 301 आणि हरियाणामध्ये 148 आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी 84.77 टक्के केस याच पाच राज्यातील आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. लोकांनी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता केरळमध्ये आणखी एका नव्या व्हायरसची एन्ट्री झाली असून त्याने प्रशासनाची झोप उडवली आहे. नोरोव्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे.

केरळमधील दोन लहान मुलांमध्ये हा व्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आरोग्य विभाग परिस्थितीचे आकलन करत आहे, काळजी करण्याची गरज नाही. मुलांची प्रकृती स्थिर आहे.

नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. त्याची सुरुवातीची लक्षणे म्हणजे उलट्या आणि जुलाब, जे व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी सुरू होतात.

उलट्या झाल्यासारखे वाटते आणि ओटीपोटात दुखणे, ताप, डोकेदुखी आणि शरीर दुखणे जाणवते. हा व्हायरस एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्याचा बळी बनवू शकतो कारण त्याचे अनेक प्रकार आहेत. या व्हायरसवर जंतुनाशक देखील काम करत नाहीत आणि 60 अंश तापमानातही तो जिवंत राहू शकतो.