१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला.

चेन्नई सुपर किंग्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला.

आरसीबीने अखेरचे सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये प्रवेश केला. खरे तर पहिल्या ७ सामन्यांनंतर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची फक्त १ टक्के आशा उरली होती.

पण नंतरच्या काही सामन्यांमध्ये संघाने असामान्य कामगिरी केली. विराट कोहली, विल जॅक्स, यश दयाल, दिनेश कार्तिक आणि स्वप्निल सिंग या शिलेदारांनी आरसीबीसाठी चमक दाखवली.

आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली पहिल्याच सामन्यापासून संघासाठी चमकदार कामगिरी करत होता. त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी केली. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून, ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. आतापर्यंत कोहलीने १४ सामन्यांच्या १४ डावांमध्ये १५५.६० च्या स्ट्राईक रेटने ७०८ धावा केल्या आहेत.

विल जॅक्सला सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी आरसीबीने बाकावर बसवले होते. पण संधी मिळताच त्याने त्या संधीचे सोन्यात रूपांतर केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूने विल जॅकला संधी दिली आणि त्यानंतर पुढच्या ८ सामन्यांमध्ये तो सतत संघाचा भाग राहिला. ८ सामन्यांमध्ये त्याने १७५.५७ च्या स्ट्राईक रेटने २३० धावा केल्या, ज्यामध्ये १ शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

दिनेश कार्तिकने अनेकदा प्रभावी कामगिरी करून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. खरे तर ७ सामन्यांनंतर कार्तिकला मोठी खेळी करता आली नसली तरी छोट्या खेळींनी त्याने महत्त्वाचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात कार्तिकने ६ चेंडूत १४ धावा कुटल्या.

फिरकीपटू स्वप्निल सिंग हा आरसीबीसाठी लकी चार्म ठरला. त्याला सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या सामन्यापासून आरसीबीच्या विजयाची कहाणी सुरू झाली. इथूनच आरसीबीने आपला विजयरथ कायम ठेवत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. यादरम्यान स्वप्निलने ६ बळी आणि २८ धावा केल्या.

वेगवान गोलंदाज यश दयालसाठी आयपीएल २०२४ चा हंगाम खास राहिला आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी करून टीकाकारांना उत्तर देण्यात यश मिळवले. ५ कोटी रूपये देऊन आरसीबीच्या फ्रँचायझीने यशचा आपल्या ताफ्यात समावेश केला. चेन्नईविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात यश दयालने शेवटच्या षटकात अवघ्या ७ धावा देत संघाला प्ले ऑफमध्ये नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. यशने या हंगामात १३ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत.