Coronavirus : गोमुत्र हा कोरोनावरील प्रभावी उपाय, अजब दावा करत भाजपा आमदाराने कॅमेऱ्यासमोर केलं गोमुत्र प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 23:47 IST2021-05-07T23:44:53+5:302021-05-07T23:47:34+5:30
Coronavirus News : उत्तर प्रदेशमधील एका भाजपा आमदाराने कोरोनापासून बचाव करणायासाठी गोमुत्राचा उपाय सांगितला आहे.

भारतामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाने थैमान घातले आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. संसर्ग झालेल्या लोकांना कसे वाचवायचे या विचाराने डॉक्टरही हैराण झाले आहेत. यादरम्यान, उत्तर प्रदेशमधील एका भाजपा आमदाराने कोरोनापासून बचाव करणायासाठी गोमुत्राचा उपाय सांगितला आहे.

उत्तर प्रदेशमधील बलिया येथील बैरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायर होत आहे. या व्हिडीओमध्ये ते स्वत:च डॉक्टर बनले असून, कोरोनापासून बचावासाठीचा अजब उपाय सांगताना दिसत आहेत.

भाजपा आमदारांनी कोरोनापासून बचावासाठीचा गोमुत्र प्राशन करतानाचा व्हिडीओ स्वत:च व्हायरल केला आहे. यामध्ये ते लोकांना गोमुत्र प्राशन करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. गोमुत्र प्राशनामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येते. जनतेमध्ये १८-१८ तास काम केल्यानंतरही निरोगी राहण्यामागचे रहस्य गोमुत्र प्राशन हेच आहे, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी केला.

विज्ञानाने मान्य करो वा न करो माझा गोमुत्रावर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच गोमुत्र कसे प्राशन करायचे याचीही कृती सांगितली आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात दोन तीन चमचे गोमुत्र टाकून प्राशन करावे. त्यानंतर अर्ध्या तासानेच काही खाले पिले पाहिजे.

तुम्ही कुठल्याही गोमुत्राचे प्राशन करा. तसेच याशिवाय हळदीची भुकटी करून ती पावडर सेवन केल्याने खूप फायदा होतो आणि आजार दूर राहतात असेही त्यांनी सांगितले.

















