Coronavirus: कोरोनाच्या भारतात मिळालेल्या स्ट्रेनचे WHO ने केले नामकरण, दिले हे नाव  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:54 AM2021-06-01T07:54:41+5:302021-06-01T07:58:51+5:30

Coronavirus in India: कोरोनाच्या व्हेरिएंटच्या अस्तित्वावरून वाद होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना म्हणजेच SARS-CoV-2 च्या मुख्य व्हेरिएंटना नावांनी ओळखण्यासाठी आमि लक्षात ठेवण्यासाठी या व्हेरिएंटचे नामकरण केले आहे.

कोरोनाच्या व्हेरिएंटच्या अस्तित्वावरून वाद होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना म्हणजेच SARS-CoV-2 च्या मुख्य व्हेरिएंटना नावांनी ओळखण्यासाठी आमि लक्षात ठेवण्यासाठी या व्हेरिएंटचे नामकरण केले आहे. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या या विषाणूंचे नामकरण ग्रीक अल्फाबेटचा वापर करून करण्यात आले आहे.

कोरोना व्हेरिएंटना ही नावे व्यापक सल्लामसलत आणि समीक्षेनंतर देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी जगभरातील तज्ज्ञांच्या समुहांना अशी नावे सुचवण्सा सांगितले होते. यामध्ये नेमिंग सिस्टिममधील तज्ज्ञ लोकांचाही समावेश होता. तसेच नॉमनक्लेचर, व्हायरस टॉक्सोनॉमिक एक्सपर्ट्स आणि राष्ट्रीय प्राधिकरणांचाही समावेश आहे.

WHO कोरोनाच्या त्या व्हेरिएंट्ससाठी लेबल असाइन करणार आहे ज्यांना उल्लेख व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्ट किंवा व्हेरिएंट ऑफ कंसर्न म्हणून नामित करण्यात आले आहे. भारतामध्ये ऑक्टोबर २०२० मध्ये मिळालेला कोरोना व्हेरिएंट  B.1.617.2  G/452R.V3 या विषाणूच्या व्हेरिएंटचेही नामकरण करण्यात आले आहे. या व्हेरिएंटला डेल्टा असे नाव देण्यात आले आहे. तर भारतातच मिळालेल्या विषाणूच्या अन्य एका स्ट्रेनला (B.1.617.1) कप्पा असे नाव देण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये २०२० च्या सप्टेंबर महिन्यात सापडलेल्या व्हेरिएंटचे नाव अल्फा असे ठेवण्यात आले आहे. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या व्हेरिएंटचे नाव बीटा असे ठेवण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मिळालेल्या कोरोनाच्या स्ट्रेनला गामा असे नाव देण्यात आले आहे. तर दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या स्ट्रेनचे नामकरण एप्सिलॉन आणि फिलिपिन्समध्ये यावर्षी मिळालेल्या स्ट्रेनचे नाव थिटा असे ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, भारतामध्ये मिळालेल्या कोरोना व्हेरिएंटवरून मोठ्या प्रमाणात वादही झाला होता. हल्लीच केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटला भारताच्या नावाशी जोडणारा मजकूर हटवण्याचा आदेश दिला होता.

भारतामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून, या काळात कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.