'हे' आहे जगातील सर्वात महागडं तुरूंग, कैद्यांवर होणारा खर्च वाचाल तर चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 04:55 PM2021-08-28T16:55:56+5:302021-08-28T17:05:55+5:30

नुकताच अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर एका तालिबानी कमांडरने भाषणात उल्लेख केला होता की, तो साधारण ८ वर्षे ग्वांतानामो तुरूंगात राहिला होता.

जगभरात अनेक तुरूंग आहेत. यातील काही तुरूंग हे त्यांच्या खास गोष्टींसाठी ओळखले जातात. यातील एक तुरूंग जगातलं सर्वात महागडं तुरूंग मानलं जातं. म्हणजे या तुरूंगातील कैद्यांवर वर्षाला ९३ कोटी रूपये खर्च केले जातात. या तुरूंगाचं नाव आहे ग्वांतानामो बे. हे तुरूंग क्यूबामध्ये आहे.

हा तुरूंग ग्वांतानामो खाडीच्या तटावर आहे. त्यामुळेच या तुरूंगाला ग्वांतानामो बे म्हटलं जातं. नुकताच अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर एका तालिबानी कमांडरने भाषणात उल्लेख केला होता की, तो साधारण ८ वर्षे ग्वांतानामो तुरूंगात राहिला होता.

या तुरूंगात जगभरातील सर्वात कुख्यात दहशतवाद्यांना कैद केलं जातं. इथे सिक्युरिटी इतकी मजबूत असते की, इथे जाणं सोपं नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या तुरूंगात प्रत्येक कैद्यासाठी ४५ सैनिक तैनात आहेत. या तुरूंगात एकूण १८०० सैनिक आहेत. ग्वांतानामो तुरूंगात सध्या एकूण ४० कैदी बंद आहे.

तुरूंगात प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा स्टाफ आहे. तरूंग तीन इमारतींमध्ये विभागला आहे. ज्यात २ गुप्त हेडक्वार्टर आहेत. यात ३ क्लीनिकही आहेत. इतकंच नाही तर या तुरूंगाच्या आतच कोर्ट, पेरोल बोर्ड आणि हीअरिंग रूमही आहे. या तुरूंगात अनेक हायटेक सुविधाही आहेत.

तुरूंगात कैदी प्रायव्हेट रूममध्ये आपल्या वकिलांसोबत आरामात बोलू शकतात. त्यासोबतच इथे कैद्यांसाठी जिम, प्ले स्टेशन आणि सिनेमा हॉलसारख्या सुविधाही आहेत. कैद्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञही नियुक्त करण्यात आलाय.

क्यूबामध्ये असलेलं हे तुरूंग आधी अमेरिकन नेव्हीचा बेस होता. त्यानंतर हा बेस हायटेक तुरूंगात बदलण्यात आला. हळूहळू तिथे कुख्यात दहशतवाद्यांना ठेवण्यात येऊ लागलं होतं. जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी खर्च खूप जास्त होत असल्याने हे तरूंग बंद करण्याचं म्हटलं होतं. पण ते असं करू शकले नाहीत. बायडन सुद्धा नुकतेच असं म्हणाले होते.

दरम्यान ज्या तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता. त्यातील एका कमांडरने दावा केला होता की, तो ग्वांतानामो तुरूंगात ८ वर्षे कैद होता. त्यामुळे तालिबानी कमांडरला अमेरिकन सरकारने ९/११ हल्ल्याच्या संशयात ग्वांतानामो बे मध्ये बंद केलं होतं.