India-UK FTA: ऋषी सुनक पंतप्रधान बनताच भारतासाठी पहिलीच गुड न्यूज; ब्रिटननं केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:52 PM2022-10-27T14:52:14+5:302022-10-27T14:56:05+5:30

यंदाच्या वर्षी ब्रिटनने ३ पंतप्रधान पाहिले आहेत. राजकीय आणि आर्थिक संकटामुळे देशाची कमान वेगवेगळ्या हातात गेल्याचं दिसून आले. या राजकीय समीकरणांचा परिणाम केवळ ब्रिटनवरच झाला नाही, तर भारतावरही झाला आहे.

यंदाच्या दिवाळीपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील फ्री ट्रेड करार (FTA) पूर्ण होणार होता. पण तिथले देशांतर्गत राजकारण इतर काही प्राधान्यक्रमात इतके अडकले आहे की जानेवारीपासून सुरू झालेली एफटीएची ही प्रक्रिया दिवाळीपर्यंत साध्य करता आली नाही. पण आता ब्रिटनची कमान मूळ भारतीयाच्या हाती येताच ब्रिटनने भारतासोबत सर्वोत्तम एफटीए करणार असल्याचं म्हटलं आहे.

ब्रिटननं सांगितले की, आम्ही एफटीएवर काम करत आहोत जेणेकरून दोन्ही देशाला त्याचा चांगला फायदा होईल. दिवाळीपर्यंत एफटीए लागू करण्याची योजना होती. परंतु ब्रिटनमधील राजकीय संकट आणि अनेक मुद्द्यांवर एकमत न झाल्याने ते शक्य झालं नाही. परंतु आता पंतप्रधानपदी ऋषी सुनक आल्यानंतर दुसऱ्यादिवशीच आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हँडस यांनी सकारात्मक भाष्य केले आहे.

ते म्हणाले की, भारत-ब्रिटनमध्ये संवाद जवळपास पूर्ण झाला आहे. आता लवकरच पुढील कार्यवाही करणार आहे. भारत एक आर्थिक महाशक्ती आहे. जी २०५० सालापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनू शकते असं ब्रिटनने म्हटलं आहे.

ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हँड्स यांच्या मते, मजबूत एफटीएमुळे ब्रिटन आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंधही मजबूत होतील. FTA मुळे ब्रिटिश कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत आणखी वाव मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक प्रगती आणि रोजगार वाढवण्यासाठी मदत मिळू शकते. ब्रिटनमध्ये आता राजकीय स्थिरता आली आहे. FTA लागू केल्यानंतर २०३० पर्यंत दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांना पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा गृहसचिव बनवण्यात आले आहे. त्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या समर्थक होत्या आणि त्यांच्या सरकारमध्ये गृह सचिव देखील होत्या, परंतु त्या राजीनामा देणाऱ्यांपैकी एक होत्या. यानंतर त्या सुनक यांना साथ देत होत्या.

FTA म्हणजे काय? - FTA म्हणजे दोन्ही देशातील व्यापार करार ज्या अंतर्गत दोन्ही देशात आयात निर्यातीवर कर लागणार नाही. हे दोन किंवा अधिक देशांच्या समुहात असू शकते. भारताने सर्वात आधी आशियातील देशांसमावेत FTA केला आहे. त्यानंतर भारताने आसियान आणि सार्क देशांसोबत हा करार केला आहे.

ब्रिटिश सरकारचा अंदाज आहे की एफटीएमुळे २०३५ पर्यंत दोन्ही देशांमधील एकूण व्यापार सुमारे २३१० अब्ज रुपयांनी वाढू शकतो. २०१९ मध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे २३ अब्ज युरो म्हणजेच १९०० अब्ज रुपयांचा होता.

एफटीएमुळे भारतातून चामडे, कापड, दागिने आणि कृषी उत्पादन प्रक्रिया केलेल्या वस्तूंची निर्यात वाढू शकते. दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारात वाढ होणार आहे. या करारामुळे ब्रिटनमधील उत्पादकांना नवीन बाजारपेठ मिळेल त्यात खाण्यापासून तंत्रज्ञानापर्यंत ऑटोमोबाईल, सर्व्हिस सेक्टरचा समावेश असेल.

एफटीएमध्ये, ब्रिटनला विशेषतः स्कॉच व्हिस्की आणि कारवरील आयात शुल्क कमी करायचे आहे. भारतात स्कॉच व्हिस्कीवर सुमारे १५० टक्के आयात शुल्क आणि कारवर १२५ टक्के शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत या आयात शुल्कात सूट मिळाल्यास भारतात ब्रिटिश व्हिस्की आणि कारची विक्री वाढू शकते असा अंदाज आहे.