Russia-Ukraine War: युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियन सैन्य 'झुकलं', कीव्हला वेढा घालण्यात अपयश, मिळालं जशात तसं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:56 PM2022-03-21T17:56:16+5:302022-03-21T18:01:36+5:30

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन सैन्याच्या जोरदार प्रतिकारामुळे ईशान्येकडून कीव्हकडे कूच करणाऱ्या रशियन सैन्याचा वेग आता मंदावला आहे. युक्रेनियन सैन्य रशियन सैन्याला नेमकं कसं प्रत्युत्तर देत आहे जाणून घेऊयात...

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता एक महिना पूर्ण होईल. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, मात्र युद्ध संपवण्याबाबतची चर्चा पुढे सरकलेली नाही. रशिया युक्रेनची राजधानी कीव्हला वेढा घालण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यास यश मिळताना दिसत नाही.

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सोशल मीडियावर जारी केलेल्या अपडेटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याला कीव्हला वेढा घालण्यात अपयश आलेलं आहे. पण युक्रेनच्या राजधानीच्या उत्तरेला भीषण लढाई सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे.

रशियन सैनिकांच्या हल्ल्याला युक्रेनियन सैनिक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यानं उत्तर-पूर्वेकडून कीव्हकडे कूच करणाऱ्या युक्रेनियन सैन्याच्या जोरदार प्रतिकारामुळे मंदावली आहे, तर हॉस्टोमोलच्या दिशेने उत्तर-पश्चिमेकडे जाणाऱ्या रशियन सैन्याला मागे ढकलण्यात आलं आहे.

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की रशियन सैन्यातील बहुतेक कर्मचारी कीव्हच्या केंद्रापासून 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर होते. मंद गती असूनही, कीव्ह ताब्यात घेणं हे रशियन सैन्याचं प्राधान्य आहे आणि ते येत्या काही दिवसांत शहराला वेढा घालण्याचा प्रयत्न तीव्र करतील.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्याचे आवाहन केल्यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी पुढाकार घेतला. आम्ही मॉस्को आणि कीव्ह यांच्याशी अतिशय संवेदनशील, उदार आणि जबाबदार रीतीने व्यवहार करत आहोत, असं इस्राईलचे पंतप्रधान म्हणाले.

“इस्रायल पहिल्या दिवसापासून युक्रेनला विविध माध्यमांतून मानवतावादी मदत पुरवत आहे.”, अशी माहिती बेनेट यांनी पत्रकारांना दिली. सीमेवर निर्वासितांसाठी फील्ड हॉस्पिटल बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

रविवारी रात्रीपासून रशियन सैन्याने केलेल्या भीषण गोळीबारात युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एक शॉपिंग सेंटर उद्ध्वस्त झालं. सोमवारी सकाळी गगनचुंबी इमारतींमध्ये असलेल्या या शॉपिंग सेंटरच्या ढिगाऱ्यातून ज्वाळा उठताना दिसल्या.

आपत्कालीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य कीव्हमध्ये रात्रभर झालेल्या गोळीबारात किमान आठ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, रशियन हल्ले इतके तीव्र होते की इमारतींच्या जवळजवळ प्रत्येक खिडकीचा चक्काचूर झाला होता आणि त्यातील शिगाही वितळल्या होत्या.