Russia Ukraine War: पुतिन यांच्या आदेशानं जग हादरले; Nuclear Deterrent Force म्हणजे काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:44 PM2022-02-28T13:44:50+5:302022-02-28T13:49:05+5:30

गेल्या ५ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरु असून यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियानं कब्जा केला आहे.

रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाला ५ दिवस उलटले आहेत. अद्यापही बलाढ्य रशियासमोर हार मानण्यास यूक्रेन तयार नाही. यूक्रेनही ताकदीनं आणि युक्तीनं रशियाविरोधात हल्ला करत आहे. त्यामुळे यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याची दमछाक उडताना दिसून येते.

रशिया-यूक्रेन युद्धात आता रशियाचंही मोठं नुकसान होत असल्यानं आता आण्विक हल्ल्याचं संकट उभं राहत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा धोका पाहता रविवारी Nuclear Deterrent Force ला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

पुतिन यांनी दिलेल्या आदेशानंतर जगात आण्विक युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. रशिया-यूक्रेन यांच्यात २४ फेब्रुवारीला सकाळी युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर जगभरात पुतिन यांच्या निर्णयावर टीका झाली. अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले.

पाश्चात्य देशांकडून सातत्याने रशियाविरोधात विधानं येत आहेत. ज्यात रशियावर टीका होत आहे. निर्बंधामुळे रशियाची आर्थिक कोंडी आणि देशविरोधी विधानं सुरू असल्याने रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी Nuclear Deterrent Force ला अलर्ट राहण्यास सांगितले आहे.

राष्ट्रपती पुतिन यांनी देशाला संबोधित करताना पाश्चात्य देशांनी लावलेले निर्बंध बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत नाटो देशाकडून आमच्या देशाविरोधात आक्रमक विधानं येत आहेत असं म्हटलं. यापूर्वी युद्धाची घोषणा करताना पुतिन यांनी आमच्या युद्धात कुणी इतर मध्ये पडल्यास त्याचे परिणाम भयंकर होतील. जे कुणी याआधी पाहिले नाहीत असा इशारा दिला होता.

काय आहे Nuclear Deterrent Force? Nuclear Deterrent Force म्हणजे आण्विक हल्ला आणि अशा हल्ल्यांपासून संरक्षण करणारी तुकडी. शीतयुद्धावेळी Nuclear Deterrent थेअरी समोर आली होती. जेव्हा सोवियत संघ आणि अमेरिका यांच्यात तणाव होता.

अमेरिकेने Nuclear Deterrent Strategy अंमलात आणली. त्याचा अर्थ असा होता जर सोवियत संघ अथवा कुठल्याही देशाने अमेरिकेवर आण्विक हल्ला केला तर त्याला कडक भाषेत उत्तर दिलं जाईल. आता हीच रणनीती पुतिन वापरत आहेत.

पुतिन यांनी संकेत दिलेत की, जर अमेरिका आणि नाटो देशाकडून निर्बंध लावले आणि यूक्रेनच्या सैन्याची मदत केली तर त्याला उत्तर आण्विक हल्ल्याने दिलं जाईल. जगातील सर्वात जास्त आण्विक हत्यारं रशियाकडे आहेत. त्याचसोबत युद्धाच्या परिस्थितीत ही हत्यारं सज्ज ठेवण्यास सांगितली आहेत.

अमेरिका अथवा नाटो देश रशियाविरोधात आण्विक हल्ल्याची सुरुवात पहिल्यांदा करतील याबाबत शक्यता फारच कमी आहे. परंतु रशिया अमेरिका, फ्रान्स, पाकिस्तान, यूके आणि उत्तर कोरियाविरोधात आण्विक शस्त्राचा वापर पहिल्यांदा न करण्याबाबत नकार देत आहेत. म्हणजे परिस्थिती बिघडली तर आण्विक हल्ला करण्यास रशिया मागे हटणार नाही.

फेडरेशन ऑफ अमेरिकन साइंटिस्टच्या ताज्या अंदाजानुसार, यावेळी रशियाकडे सर्वात जास्त आण्विक हत्यारं आहेत. रशियाकडे ५ हजार ९७७ तर अमेरिकेकडे ५ हजार ४२८ आण्विक हत्यारं आहेत. यूक्रेनकडे आजच्या घडीला एकही आण्विक हत्यार नाही.