बिन कामाचे पाकिस्तानी! बायडेन यांच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते इम्रान खान, आलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:25 PM2021-10-06T22:25:18+5:302021-10-06T22:31:18+5:30

Imran Khan is waiting for a call from Joe Biden बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एकही फोन केलेला नाहीय. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी आपल्याच खात्यातील विदेशातल्या दुतावासांवर नाराज आहेत. अमेरिकेतील पाकिस्तानी दुतावासाला त्यांनी खरमरीत पत्र लिहून अकार्यक्षम असल्याचे म्हटले आहे. आता पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात कुरेशी यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान राजनैतिक संबंधांची कमतरता असल्याचे म्हणत नाराजी व्य़क्त केली आहे.

झाले असे की, पाकिस्तानच्या कांगाव्यानुसार अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थीतीवर पाकिस्तानने महत्वाची भूमिका निभावली आहे. अमेरिकेला वेळोवेळी मदत केली आहे. मात्र, तरीदेखील अमेरिकेचे नेतृत्व पाकिस्तानवर नाराज आहे. पाकिस्तानने अनेक प्रयत्न करूनही अमेरिकेकडून काहीच प्रतिसाद येत नसल्याने पंतप्रधान कार्यालय नाराज झाले आहे.

कुरेशी या पत्रात म्हणालेकी, पाकिस्तानचे पंतप्रधान कार्यालय आणि वॉशिंग्टनमधील अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष कार्यालयादरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास किंवा टिकविण्यास पाकिस्तानी दुतावास अकार्यक्षम ठरला आहे. यामुळे परराष्ट्र मंत्रालय यावर नाराजी व्यक्त कर आहे.

बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एकही फोन केलेला नाहीय. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाले आहे. कुरेशी पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या राजनैतिक दृष्टीकोणामध्ये कमतरता दिसून येत आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील कर्मचाऱ्यांनी दया दाखविली तरच पाकिस्तानचे कर्मचारी काम करू शकतात. यामुळे तुम्ही पर्यायी व्यवस्था करावी असे ते म्हणाले.

जो बायडेन यांनी फोन न केल्याने खुद्द इम्रान खान यांनीच सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक व्यस्त व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांनी कदाचित फोन केला नसेल असे तेम्हणाले.

दुसरीकडे बोलबच्चन देणारे पाकिस्तानी राष्ट्रीय सल्लागार मोइद यूसुफ यांनी धमकीच्या स्वरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सतत पाकिस्तानची उपेक्षा करत राहिले तर आमच्यासमोर अन्य पर्याय आहेत, असे म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन केला होता. परंतू बायडेन यांनी फोन न केल्याने इम्रान खान टेन्शनमध्ये आले आहेत. बायडेन यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू व्हाईट हाऊस खानना भीक घालत नाहीय. तज्ज्ञांनुसार बायडेन यानी पाकिस्तानपासून थोडे अंतर ठेवणे पसंत केले आहे.