डेटवर येताना गर्लफ्रेंडने मित्रांचा गोतावळा सोबत आणला, बिल पाहून बॉयफ्रेंडने रेस्टॉरंटमधून पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 07:56 PM2020-10-21T19:56:11+5:302020-10-21T20:06:54+5:30

Jara Hatke News : प्रियकर-प्रेयसीने डेटवर जाणे ही आज सामान्य बाब बनली आहे. मात्र एका तरुणाला आपल्या प्रेयसीला डेटवर घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे.

प्रियकर-प्रेयसीने डेटवर जाणे ही आज सामान्य बाब बनली आहे. मात्र एका तरुणाला आपल्या प्रेयसीला डेटवर घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाची प्रेयसी मित्र आणि नातेवाईक असा मिळून २३ जणांचा गोतावळा सोबत घेऊन डेटवर आली. त्यानंतर रेस्टॉरंटचे आलेले बिल पाहून या प्रियकराला तिथून पळ काढावा लागला.

चीनमधील झेझियांग प्रांतात सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आलेल्या एका जोड्याने ब्लाइंड डेटचा प्लॅन बनवला होता. त्यासाठी त्यांनी एका रेस्टॉरंटची निवड केली. तिथे त्यांची पहिलीच भेट होणार होती.

हा तरुण ठरलेल्या वेळी त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला आणि आपल्या प्रेयसीची वाट पाहू लागला. त्या तरुणाची प्रेयसी डेटवर आली. पण येताना ती एकटी आली नाही तर ती आपले मित्र आणि नातेवाईक अशा मिळून २३ जणांना घेऊन आली.

सुरुवातीला सगळे व्यवस्थित चालले. सर्वांना एकमेकांची भेट घेटली सोबत जेवण केले. त्यानंतर जेव्हा रेस्टॉरंटने तरुणाला बिल दिले तेव्हा ते बिल पाहून सदर बॉयफ्रेंडचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. बिलाचा आकडा पाहिल्यावर तो तिथून पसार झाला.

या युवकाला या डेटचे सुमारे १९ हजार ८०० युआन म्हणजेच तब्बल २ लाख १७ हजार रुपयांचे बिल आले. ही रक्कम पाहून त्या तरुणाच्या पायाखालील वाळू सरकली. मग तिथून पळ काढणेच त्याने योग्य समजले आणि तिथून काढता पाय घेतला.

दरम्यान, या प्रकाराबाबत तरुणीने सांगितले की, ती प्रियकराचे औदार्य जाणून घेण्यासाठी ब्लाइंड डेटवर आपले २३ मित्र आणि नातेवाईकांसोबत आली होती. मात्र हा प्रियकर पसार झाल्याने या तरुणीलाच रेस्टॉरंट्सचे २ लाख १७ हजार रुपयांचे बिल भरावे लागले. मात्र या प्रकारानंतर सदर तरुणीने तरुणाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. अखेरीस हा तरुण केवळ दोन टेबलांचे बिल भरण्यास तयार झाला.