Russia Ukraine War: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; रशिया-यूक्रेन युद्धात चीन झाला मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:12 PM2022-04-25T14:12:46+5:302022-04-25T14:16:18+5:30

रशिया यूक्रेन युद्ध सुरू होताच युरोपातील अनेक राष्ट्रे आणि अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादले. परंतु चीन कायम रशियाच्या बाजूने ठाम उभा राहिला. दोन देशांमधील भांडणातून संधी शोधत चीननं आपला आर्थिक फायदा होईल यासाठी पुरेपुरे प्रयत्न केले आहेत.

शस्त्रात्रे खरेदीत फायदा – चीन आणि रशिया एकमेकांना संरक्षण साहित्य पुरवतात. यामुळे रशियन शस्त्रे आणि तंत्रज्ञानाची हुबेहुब नक्कल करत चीनला आपली शस्त्रे तयार करण्याची मुभा मिळते. यालाच रिवर्स इंजिनिअरिंग असे म्हणतात.

दोन्ही देशांना विकले ड्रोन? चीनच्या जीजेआय या कंपनीने बनवलेल्या ड्रोनचा वापर यूक्रेननं रशियाविरोधात केल्याचं उघड झाले आहे. यूक्रेनने चीनकडून २ हजार ३७२ क्वाडकॉप्टर ११ मिलिटरी एरिअल व्हेहिकल ड्रोन ५१३ अरब रुपयांमध्ये खरेदी केले आहेत.

रशियानं याच ड्रोनच्या सहाय्याने यूक्रेनच्या क्षेपणास्त्राचा माग काढला असा आरोप युक्रेनने केला. चीननं आतापर्यंत रशियाकडून एस ४०० संरक्षण प्रणाली सुखोई फायटर विमाने, पाणबुड्या, एके १७६ बंदुका, एमआय १७ हेलिकॉप्टर्स खरेदी केली आहेत.

चीनी सीयूपीचा दबदबा वाढला. चीन पेमेंट करण्यासाठी चायना युनियन पे या सिस्टमचा वापर करतो. युरोपियन देशांनी स्विफ्टमधून बाहेर केल्याने रशियाला पेमेंट प्रक्रियेसाठी चीनच्या सीयूपीचा आधार घ्यावा लागला. या संधीचा वापर चीनने जगभर सीयूपीचा दबदबा वाढावा यासाठी करून घेतला.

रशिया आणि यूक्रेन युद्धाला एक जवळपास २ महिने होत आले. त्याआधीच चीनने रशियाच्या गहू आयातवरील निर्बंध हटवले. गहू खरेदीचे करार करून आपल्याकडील गव्हाचा साठा मुबलक राहील याची तजवीज केली. पुतिनसोबत चीनने नवीन गॅस पाइपलाइन खरेदीसाठी ११७ अरब डॉलरचा करार केला.

युद्धाच्या काही आठवडे आधी चीनने रशियाकडून कोळसा खरेदीसाठी २० अरब डॉलरचे करार केले. रशिया-यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर त्याचे पडसाद जगभरात उमटले. त्यानंतर नाटो देशांसह अमेरिकेने रशियावर निर्बंध लादत आर्थिक कोंडी केली. त्यात चीनने रशियासोबत गहू, गॅस आणि कोळसा खरेदी केला.

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की (volodymyr zelensky) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी भेटून युद्ध संपवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

"रशिया आणि युक्रेनमध्ये शांती परतणार असेल, तर मी पुतिन यांच्याशी बोलण्यास तयार आहे. आम्ही तर सुरुवातीपासूनच रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधण्याचा आग्रह धरला आहे. हा संघर्ष राजनैतिक मार्गाने सोडवला जावा अशी आमची इच्छा आहे असं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त ३८ अब्ज रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे. युक्रेनमधील कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, तसेच शासकीय योजनांसाठी हा पैसा खर्च करण्यात येईल. रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे जगातील देशांनी मदत करावी, असे आवाहन युक्रेनने केले होते.