Al-Zawahiri Killed: आयमन अल जवाहिरी पेशानं सर्जन असूनही बनला होता दहशतवादी! इथं झाली होती लादेनची पहिली भेट, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 10:05 AM2022-08-02T10:05:30+5:302022-08-02T10:08:43+5:30

स्वतः अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीच जवाहिरीचा खात्मा केल्याची पुष्टी केली आहे.

अमेरिकेने अलकायदाचा म्होरक्या आयमन अल-जवाहिरीचा खात्मा केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) अफगानिस्तानमध्ये ड्रोन हल्ला करून जवाहिरी संपवला. यानंतर स्वतः अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीच जवाहिरीचा खात्मा केल्याची पुष्टी केली आहे.

याच जवाहिरीने अमेरिकेत 11 सप्टेंबर, 2001 रोजी झालेल्या हल्ल्यासाठी चार विमाने हायजॅक करण्यासाठी मदत केली होती. यांपैकी 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (WTC) दोन्ही टावर्सना धडकले होते. तिसरे विमान अमेरिकेचा संरक्षण विभाग अर्थात पेंटागॉनला धडकले होते. तर चौथे विमान शेंकविले येथे एका शेतात कॅश झाले होते. या दहशतवादी घटनेत जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला होता जन्म - अल जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 मध्ये एका संपन्न अशा इजिप्शियन कुटुंबात झाला होता. तो पेशाने सर्जन होता. तो 14 वर्षांचा असतानाच मुस्लीम ब्रदरहुडचा सदस्य झाला होता. त्याने 1978 मध्ये काहिरा विद्यापीठातील फिलॉसॉफीची विद्यार्थिनी अजा नोवारी हिच्यासोबत लग्न केले होते. त्याच्या लग्नाच्यावेळी महिला आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. फोटोग्राफर मंडळींनाही दूरच ठेवण्यात आले होते. एवढेच नाही, तर लग्नात गमती-जमतीवरही बंदी होती.

EIJ ची स्थापनाही केली होती - जवाहिरीने इजिप्टियन इस्लामिक जिहाद अर्थात EIJ ची स्थापनाही केली होती. या दहशतवादी संघटनेने 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध केला होता. इजिप्तमध्ये इस्लामिक राजवटीचे वर्चस्व असायला हवे, अशी त्यांची इच्छा होती.

1981 मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अनवर सादात यांच्या हत्येनंतर, ज्या शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती. त्यात जवाहिरीचाही समावेश होता. 3 वर्षे कारागृहात राहिल्यानंतर, तो इजिप्त सोडून सौदी अरेबियामध्ये गेला.

पेशावरमध्ये लादेनची भेट - सौदीमध्ये त्याने मेडिकल प्रॅक्टिसही सुरू केली होती. येथेच त्याची भेट अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनसोबत झाली. लादेन अलकायदाला बळकटी देण्यासाठी 1985 मध्ये पाकिस्तानातील पेशावर येथे गेला होता. यावेळी अल जवाहिरी देखील तेथे होता. येथूनच या दोघांचे संबंध अधिक बळकट झाले.

यानंतर, अल जवाहिरीने 2001 मध्ये EIJ ला अलकायदामध्ये विलीन केले. यानंतर दोघांनी मिळून जगात मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्यासाठी कटकारस्थान रचायला सुरुवात केली. अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतकर, जवाहिरीने संपूर्ण अलकायदाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. 2011 मध्ये तो अलकायदाचा प्रमुख बनला होता.