भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:07 AM2024-04-30T04:07:37+5:302024-04-30T04:09:42+5:30

सत्तेत आल्यास जातीय जनगणना, आर्थिक सर्वेक्षणाची दिली ग्वाही

lok sabha election 2024 BJP and rss plans to change constitution says Rahul Gandhi | भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

पाटण (गुजरात) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे. मात्र लोकांना हे सर्व माहिती आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली तर मागासवर्गीय, आदिवासी, खुल्या गटातील गरीब आणि ओबीसींचा सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्याने देशव्यापी जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाहीदेखील गांधी यांनी सोमवारी दिली.

कॉंग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ उत्तर गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचारसभेत गांधी बोलत होते. “देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा समावेश आहे, परंतु कॉर्पोरेट, प्रसार माध्यमे, खासगी रुग्णालये, खासगी विद्यापीठे किंवा सरकारी नोकरशहांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व तुम्हाला आढळणार नाही. केंद्रातील कामकाजाच्या प्रमुखपदी असलेल्या ९० आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त तीनच मागासवर्गीय आहेत आणि त्यांनाही नगण्य पदे देण्यात आली आहेत.

भाजपने विषमता आणली

भाजपने १० वर्षांच्या राजवटीत देशात संपत्तीची विषमता आणली. देशातील केवळ २२ जणांकडे लोकसंख्येच्या ७० टक्के इतकी संपत्ती आहे, असा आरोपही त्यांनी केला. तत्पूर्वी राहुल यांची छत्तीसगडमधील बिलासपूर येथेह प्रचार सभा झाली. त्यातही त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

अग्निवीर योजना बंद करणार

भाजपला शेतकरी, गरिब, मागासवर्गीयांच्या फायद्याच्या योजना बंद करायच्या आहेत. खासगीकरण आणि अग्निपथ-अग्निवीर लष्करी भरती योजना ही आरक्षण संपवण्याची या सरकारची दोन साधने आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यावर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे गांधी यांनी ठामपणे सांगितले.

Web Title: lok sabha election 2024 BJP and rss plans to change constitution says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.