High Blood Pressure: 'ही' सात लक्षणं सांगतात तुमचं ब्लड प्रेशर आहे जास्त हाय, तज्ज्ञांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 01:00 PM2021-08-05T13:00:34+5:302021-08-05T13:48:29+5:30

बीपी म्हणजे ब्लड प्रेशर (sign high blood pressure) अर्थात उच्च रक्तदाब होय. ही समस्या अनेकांना सामान्य वाटते पण ती जितकी सामान्य वाटते तितकी अजिबात नाही. पूर्वी रक्तदाबाची समस्या फार कमी व्यक्तींमध्ये दिसून यायची. पण आता लोकांची आहारशैली आणि जीवनशैली बदललेली आहे व त्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

रक्तदाबाच्या समस्येचे सगळ्यात मोठे रहस्य म्हणजे या आजाराची कल्पना तोवर येत नाही जोवर हृदय रोग किंवा हार्ट स्ट्रोकला (heart stroke) व्यक्तीला सामोरे जावे लागत नाही आणि म्हणूनच ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असेही म्हणतात. मात्र अशी काही लक्षणे आहेत जी तुमच्या शरीराला उच्च रक्तदाब विळखा घालतो आहे हे दर्शवतात.

जेवढ्या लवकर उच्च रक्तदाब ओळखता येईल तेवढ्या लवकर तो ओळखायला हवा. जेणेकरून जीवावर बेतणार नाही. उच्च रक्तदाबाचे उशिरा निदान झाल्यास सुद्धा तो नियंत्रित करता येतो. मात्र तेव्हा व्यक्तीला खूप काळजी घ्यावी लागते.

हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.

अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो. १. साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात.

अनुषंगिक अति रक्तदाब : (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो.

उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोळ्यांनी कमी किंवा अंधूक दिसते.

चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, छातीत धडधड होणे, छातीत दुखणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे, आदी लक्षणेही दिसू लागतात.

हातापायांवर सूज येत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षणंही असू शकते अशावेळी डॉक्टरला त्वरित संपर्क साधावा.

अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.

नॅशनल हेल्थ सर्विच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित उच्च रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. अशा व्यक्तीने वर्षातून एकदा तरी रक्तदाब तपासावा.