इन्फ्ल्यूएंझा 'एच3एन2'ने वाढविली चिंता; याबाबत कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 01:19 PM2023-03-19T13:19:29+5:302023-03-19T13:59:05+5:30

इन्फ्ल्यूएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यत: लक्षणाधारीत आहे.

मुंबई : इन्फ्ल्यूएंझा या विषाणूमुळे होणारा आजार असून आता मागील काही दिवसांत ‘एच३ एन२’ या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान ‘एच१ एन१’चे ११८ तर ‘एच३ एन२’चे १५ रुग्ण सापडले आहेत. इन्फ्ल्यूएंझा टाईप एच उपप्रकार एच-एन १ एच-एन २, एच३ एन२ इत्यादी उपप्रकार आहेत. इन्फ्ल्यूएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यत: लक्षणाधारीत आहे.

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धूम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या.

हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. आपल्याला इन्फ्ल्यूएंझासदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वृद्ध व दुर्धर आजारी लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.

पाच वर्षांखालील मुले (विशेष करून एक वर्षाखालील बालके), ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती, दीर्घकाळ स्टिरॉइड औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.

संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. बहुतांश इन्फ्ल्यूएंझा रुग्ण हे साैम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे माहीत असणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे, अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे. या विषाणूवर प्रभावी औषधी उपलब्ध आहेत. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यात त्वरित दाखवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, असे मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

टॅग्स :आरोग्यHealth