सावधान! घरी आणि कार्यालयात AC मुळे पसरतोय कोरोना; 'ही' काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:30 PM2021-05-21T16:30:20+5:302021-05-21T16:35:59+5:30

कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत केंद्र सरकारनं गुरुवारी एक नवी गाइडलाइन जाहीर केली आहे. यात एअरसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणू परसण्याची माहिती देण्यात आलीय. नेमकं काय हे जाणून घेऊयात...

कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत केंद्रानं दिलेल्या नव्या गाइडलाइननुसार हवेतून विषाणू प्रसाराबाबत अत्यंत महत्वाची माहिती जाहीर केली आहे. नाक आणि तोंडावाटे निघणाऱ्या शिंतोड्यांतून विषाणू हवेतून इतर व्यक्तींमध्ये पसरण्याचा धोका आहे. त्यामुळेच बंद जागांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराचा धोका सर्वाधिक आहे.

ज्या ठिकाणी पुरेसं वेंटीलेशन आणि मोकळी हवा असलेल्या ठिकाणांना गाइडलाइनमध्ये विशेष महत्व देण्यात आलं आहे. यात रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांना हवा खेळती राहील याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय लसीकरणाची प्रक्रिया देखील मोकळ्या आणि हवेशीर जागेत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वैज्ञानिकांनी देखील ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून विषाणूचं हवेत अस्तित्व राहतं असा दावा केला आहे.

WHO ने देखील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेंटिलेशनची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं सांगितलं आहे. "सध्याच्या परिस्थितीनुसार कोरोना विषाणू अशा लोकांमध्ये मुख्यत्वे पसरतो की जे लोग एकमेकांच्या अगदी जवळ संपर्कात येतात. विशेषत: 1 मीटर किंवा त्याहूनही कमी. जेव्हा एखादा बाधित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या इतक्या जवळ संपर्कात येतो तेव्हा ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून हवेतून विषाणूचा प्रसार होऊ शकतो", असं WHO नं याआधीच स्पष्ट केलं होतं.

कोरोना विषाणू खराब वेंटिलेशन सुविधा आणि गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या तसेच बंद खोल्यांमध्ये खूपवेळ बसून राहणाऱ्या लोकांमध्ये पसरतो. यामागचं कारण म्हणजे बंद जागेत हवा कोंडून राहते आणि त्यासोबत विषाणूंचं अस्तित्व देखील कायम राहतं. बंद जागेतील हवेत विषाणू जवळपास १० मीटरपर्यंतच्या अंतरात पसरू शकतो असं केंद्रानं जारी केलेल्या नव्या गाइडलाइनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

घरातील खेळती हवा केवळ वातावरण स्वच्छ ठेवण्यातच नव्हे, तर कोणत्याही आजार किंवा विषाणूंशी लढण्यासाठी मदत देखील करते. घरात हवा खेळती राहीली तर श्वसनासंबंधी कोणतेही आजार निर्माण होण्याची शक्यता फार कमी होते. विषाणूंपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इमारतींमध्ये सुयोग्य वेंटिलेशन आणि फिल्ट्रेशन असणं अतिशय महत्वाचं आहे.

वैज्ञानिकांनी देखील पुन्हा एकदा वेंटिलेशन यंत्रणेच्या पडताळीवर जोर देण्याची मागणी केली आहे. घरातील हवा स्वच्छ आणि किटकमुक्त असायला हवी, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. घरातील वेंटिलेशन यंत्रणेत सुधार करण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर कोरोना प्रादुर्भावाला नियंत्रणात आणलं जाऊ शकेल, असं जगातील १४ देशांतील एकूण ३९ वैज्ञानिकांनी मत मांडलं आहे.

वैज्ञानिकांनी WHO ला देखील घरातील आणि कार्यालयांतील हवा खेळती राहण्यासाठी आवश्यक गाइडलाइन तयार करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय इमारतींच्या वेंटिलेशन यंत्रणेवर लक्ष देण्यास सुरुवात करण्यासंही सुचविण्यात आलं आहे.

घरात फक्त एका बाजूला पंख्याची हवा जाईल अशा पद्धतीनं रचना करू नका. स्वयंपाकघरात एग्जॉस्ट फॅन बसवून घेणं अत्यावश्यक आहे. ज्या ठिकाणी क्रॉस वेंटिलेशन सुविधा नसेल अशा ठिकाणी एग्जॉस्ट फॅनसोबतच त्या खिडकीला जाळी बसवून घेणं महत्वाचं आहे.

खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवून AC चा वापर कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे विषाणूचं अस्तित्व असलेली हवा संपूर्ण कार्यालयात पसरण्याची शक्यता असते. यामुळे प्रादुर्भावाचा धोका वाढतो. त्यामुळे AC चा वापर जितका कमी करता येईल तितकं उत्तम. यासोबतच खिडक्या खुल्या ठेवल्यानं बाहेरची मोकळी हवा आत येण्यास मदत होते.

सेंट्रलाइज एसी असणाऱ्या ठिकाणांपासून सावधान अनेक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज एसी बसविण्यात आलेला असतो. जसं की कॉपोर्रट ऑफिसेस, सभागृह, मॉल्स इत्यादी. सेंट्रलाइज एसी असणाऱ्या ठिकाणांचं रुफ वेंटिलेशन आणि फिल्टर्सवर लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. सेंट्रलाइज एसीच्या फिल्टर्सची नियमीतपणे स्वच्छता होणं अतिशय गरजेचं आहे.

११. सार्वजनिक वाहतूक सेवा सार्वजनिक वाहतूक सेवेत क्रॉस वेंटिलेशन असणं अतिशय गरजेचं आहे. बस आणि लोकलच्या खिडक्या खुल्या ठेवाव्यात. एसीची सुविधा असणाऱ्या बस आणि रेल्वेमध्ये एग्जॉस्ट यंत्रणा सुयोग्य पद्धतीनं काम करणारी हवी.

Read in English