CoronaVirus News : कोरोना फुफ्फुसाला बनवतोय दगड, अहमदाबादमधील डॉक्टरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:29 AM2020-10-02T09:29:51+5:302020-10-02T10:26:12+5:30

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लस तयार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर अनेक देशांध्ये कोरोनावर संशोधन सुरु आहे.

यासंदर्भात अनेक संशोधन भारतातही चालू आहे. दरम्यान, अहमदाबादच्या सिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना व्हायरस हा शरिरातील फुफ्फुसाला दगड कसे बनवितात हे सांगितले आहे.

अहमदाबादच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी बराच काळ कार्यरत असलेले डॉ. अमित पटेल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम फुफ्फुसांवर होतो. ज्यावेळी संसर्ग वाढतो, त्यावेळी मऊ असणारे फुफ्फुस दगडांसारखे मजबूत होते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फायब्रोसिस तर क्षयरोग आणि न्यूमोनियामध्ये देखील होतो, परंतु तो केवळ फुफ्फुसांच्या वरच्या आणि खालच्या भागात होतो. कोरोनामध्ये त्याचा जास्त प्रभाव दिसतो. संपूर्ण फुफ्फुसात फायब्रोसिस झाले. तर त्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते.

सिम्स हॉस्पिटलच्या डॉ. सुरभी यांच्या मते, रोग प्रतिकारशक्ती सक्रिय झाल्यावर त्याचा पहिला परिणाम फुफ्फुसांवर होतो. व्हायरसच्या दुष्परिणामांमुळे आणि टिश्यू दुरुस्तीस मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे फुफ्फुसातील द्रव बारीक नसांमध्ये भरला जातो, जो नंतर गोठतो. यामुळे फुफ्फुस हळूहळू कठोर होऊ लागते.

याशिवाय, कोरोनाच्या उपचारांमध्ये असे अनेक वेळा पाहिले गेले आहे की, कोरोनामुळे इतरही अनेक आजार होतात. यात हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचा परिणाम किंवा इतर शरीराच्या दुखण्यांचा समावेश असू शकतो.

याव्यतिरिक्त, काही रुग्णांना डोळ्यांच्या रेटिनामध्ये फायब्रोसिस देखील दिसला आहे, ज्यामुळे शरीराच्या या अवयवांचे गंभीर नुकसान होते, असेही डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र, मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काल गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात तब्बल 394 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे. गुरुवारी 16,104 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यातल्या बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 11 लाख 4 हजार 423 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 78.84 एवढे झाले आहे.

कोरोनाच्या काळात आरोग्याशी संबंधित संशोधनांना विशेष महत्त्व आहे त्यात ते कोरोनाबद्दल असेल तर अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील गरोदर महिलांमध्ये कोरोनाच्या बाधेसंबंधी एक सर्वेक्षण नुकतंच करण्यात आले. यामध्ये असे दिसून आले की 1140 गरोदर महिलांपैकी 141 महिला कोरोनाबाधित आहेत. हे प्रमाण 12.3 टक्के होते.